कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील मतमोजणीवेळी झालेल्या गैरप्रकाराबाबत आम्ही न्यायालयात जाणार आहोत. मॅचफिक्सींग ज्याप्रमाणे होते, त्याचप्रमाणे या निवडणुकीत मतमोजणीवेळी मतांचेही फिक्सींग झाल्याचा प्रकार घडला असल्याचा दावा संस्थापक पॅनेलचे प्रमुख अविनाश मोहिते यांनी केला. ‘कृष्णा’वर थकीत कर्जच नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कृष्णा कारखाना निवडणुकीच्या निकालाच्या पाश्र्वभूमीवर संस्थापक पॅनेलतर्फे आयोजिलेल्या आभार मेळाव्यात ते बोलत होते. श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, शेकापचे नेते अ‍ॅड. रवींद्र पवार, अ‍ॅड. बाळासाहेब पाटील-शेरेकर, अशोकराव थोरात यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
अविनाश मोहिते म्हणाले, की कृष्णा कारखान्याची पाच वर्षांपूर्वीची निवडणूक ऐतिहासिक अशी झाली. त्यानंतर पाच वर्षांत संस्थापक पॅनेलच्या माध्यमातून जी कामे केली ती सभासदांना माहिती आहेत. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मोठय़ा प्रमाणात पैशाचा आणि सत्तेचा वापर झाला. विरोधकांनी राजकीय ताकदीच्या जोरावर अधिकाऱ्यांवर दबाव आणून निवडणूक जिंकली. त्यांनी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सगळे मॅनेज केले.
निवडणुकीत सहकार पॅनेल व रयत पॅनेलच्या नेत्यांनी मोठय़ा प्रमाणात आमच्या विरोधात कारस्थाने रचली. मतांसाठी सभासदांच्या खिशात जबरदस्तीने पैसे घातले. तरीसुध्दा सभासदांनी संस्थापकाला जास्त मते दिली आहेत. आज फेरमतमोजणी केल्यास दिसून येईल की कोणाला किती मते पडली आहेत. त्यामुळे आम्ही या फेरमतमोजणीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी संजीव देशमुख यांच्या विरोधात न्यायालयात दाद मागणार आहोत. आज हा कारखाना चुकीच्या माणसाच्या हातात गेला आहे. कृष्णा कारखान्याच्या जिवावर जयवंत शुगर, ट्रस्ट उभे राहिले आहे. कारखान्याकडे लाकूड शिल्लक नाही असे सांगणाऱ्यांना माहिती नाही की, कारखान्याकडे अजूनही ९० लाख साखरेची पोती, २० लाख टन मोलॅसिस तसेच लाकूड शिल्लक आहे. जर कारखान्याच्या सभासदांना ऊसाचा कमी दर दिला तर याद राखा, जयवंत शुगरमध्ये ज्या पध्दतीने काटेमारी केली जाते त्याप्रमाणे कृष्णा कारखान्यात काटेमारी होवू देणार नाही. कारखान्याच्या माध्यमातून जयवंत शुगर चालविण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा अविनाश मोहिते यांनी दिला. निवडणुकीत भानगडी करून मते खाता येतात मात्र, माणसे तोडता येत नाहीत. निवडणुकीत मतमोजणी झाली त्यामध्ये मोठय़ाप्रमाणात मते बाद निघाली. ती नक्की बाद झाली आहेत का हे पाहणे गरजचे असल्याचे सांगताना त्यांनी डॉ. सुरेश भोसले व अतुल भोसले यांच्यावर चौफेर टीका केली. संस्थापक पॅनेलच्या न्यायालयाच्या लढाईत श्रमिक मुक्तीदल तुमच्या पाठिशी असल्याचे डॉ. भारत पाटणकर यांनी स्पष्ट केले. अ‍ॅड. रवींद्र पवार यांनी आजवर अनेक नेते पाहिले, पण अविनाश मोहितेंसारखे सोज्वळ, सद्गुणी, विनम्र व उमदे नेतृत्व पाहिले नसल्याचे सांगितले. सत्ताधारी किंगमेकरनाच डावलल्याने सामान्य सभासदांचे काय हाल होणार असा प्रश्न उपस्थित केला. अशोकराव थोरात यांनी सुरेश भोसले यांना तुमच्यात हिम्मत असेल तर आमने-सामने अध्यक्षपदाची पुन्हा निवडणूक लढवा; तुमची योग्यता समजेल असे आव्हान दिले.

Story img Loader