वाशिम जिल्ह्यात रिसोड शहरातील इंगोले बाल रुग्णालयात काम करणाऱ्या महिला नर्सवर डॉक्टरांनीच अत्याचार केल्याचा गंभीर आरोप झाला आहे. आरोपी डॉक्टरचं नाव गोपाल इंगोले असं आहे. वैद्यकीय क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे रिसोडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. आरोपी डॉक्टरविरोधात रिसोड पोलिसांनी अत्याचाराच्या गुन्ह्यासह विविध गुन्हे दाखल केले आहेत.
रिसोडच्या डॉ. गोपाल इंगोले यांच्या रुग्णालयात काम करणाऱ्या नर्सने डॉक्टरने अत्याचार केल्याने गर्भवती राहिल्याचंही म्हटलंय. दरम्यान या महिलेचा गर्भपात झाला असून पोलिसांनी तो पुरलेला गर्भ बाहेर काढून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविला आहे.
या प्रकरणी पीडित महिलेने रिसोड पोलिसांत तक्रार दिल्याने डॉक्टर गोपाल इंगोले विरोधात विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपी डॉक्टरवर प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणामुळे उपचार सुरू आहेत. गर्भाचा फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतर डी.एन.ए.वरून पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
रिसोडचे ठाणेदार देवेंद्रसिंह ठाकूर म्हणाले, “रिसोड येथील एका महिलेने डॉ. इंगोल यांच्याविरोधात पोलीस स्टेशनला तक्रार दिली. ही महिला डॉ. इंगोल यांच्याकडे नर्स म्हणून ५-६ महिने काम करत होती. अनैतिक संबंधातून नर्स गर्भवती राहिली. दरम्यान डॉक्टर आणि नर्समध्ये अनैतिक संबंध निर्माण झाले. त्यानंतर डॉक्टरांनी दिला कामावरून काढून टाकलं.”
हेही वाचा : बोलणे बंद केल्याने महिलेचा विनयभंग; कोंढवा परिसरात एकास अटक
“महिलेचा गर्भपात झाला आहे. ज्या ठिकाणी गर्भ पुरला होता तो गर्भ पोलिसांनी पंचांसमक्ष काढून डीएनए चाचणीसाठी पाठवला आहे. आरोपी डॉक्टरला आम्ही अटकेसाठी ताब्यात घेतलं. मात्र, त्यांनी प्रकृती खराब झाल्याची तक्रार केली. त्यामुळे त्यांना उपचारासाठी वैद्यकीय रुग्णालयात दाखल केलं. या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. डीएनए चाचणीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल,” असं पोलीस अधिकारी ठाकूर यांनी सांगितलं.