जिल्हा नियोजन व विकास समितीवर निवडून द्यावयाच्या एकूण २४ पैकी १२ जागांसाठी झालेल्या अटीतटीच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप युती व काँग्रेस आघाडीला प्रत्येकी ६ जागा मिळाल्या आहेत. तर यापूर्वी बिनविरोध निवडून आलेल्या १२ पैकी युतीला ७ व आघाडीला ५ जागा मिळाल्या आहेत. दरम्यान नगर परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक सुदेश मयेकर यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी माजी नगराध्यक्ष व शिवसेनेचे नगरसेवक उमेश शेटय़े यांचा पराभव केल्याने सेनेला जबर धक्का बसला आहे.
जिल्हा नियोजन समितीच्या २४ जागांसाठी जाहीर झालेल्या या निवडणुकीकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिले होते. यापैकी १२ जागा या आधीच बिनविरोध झाल्याने उर्वरित १२ जागांसाठी आघाडी व युतीच्या उमेदवारांमध्ये चुरशीची लढत झाली. काल (गुरुवार) या १२ जागांसाठी मतदान घेण्यात आले. एकूण १६० पैकी १५८ जणांनी मतदान केले. आज सकाळी रत्नागिरी येथे मतमोजणी होऊन त्याचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यात दापोली नगरपंचायत मतदारसंघातून शिवसेनेचे जावेद महंमद मणियार (सर्वसाधारण), तर नगर परिषद मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे सुदेश सदानंद मयेकर व स्नेहा संजय कुवेसकर (ना. मा. प्रवर्ग) हे विजयी झाले. तर जिल्हा परिषद मतदारसंघातून तुकाराम पांडुरंग गोलमडे, उदय विनायक बने, रचना राजेंद्र महाडिक, स्वरूपा संतोष साळवी (सर्व शिवसेना-सर्वसाधारण), सतीश मधुसूदन शेवडे (भाजप), रामचंद्र रत्नू हुमणे, अजय शांताराम बिरवटकर, संजय वसंत कदम (सर्व राष्ट्रवादी) व विलास राजाराम चाळके (काँग्रेस) हे निवडून आले आहेत.
१२ महिला बिनविरोध
तसेच बिनविरोध झालेल्या सर्वच १२ जागा महिलांनी पटकावल्या आहेत. शीतल जाधव, माधवी खताते, नेहा माने, नेत्रा ठाकूर, सुजाता तांबे (सर्व राष्ट्रवादी), मनीषा गावडे व संतोष धामणस्कर (भाजप), स्मिता जावकर, विनया गावडे, शीतल हर्डीकर, अरुणा आम्रे, वेदा फडके (सर्व शिवसेना) यांचा समावेश आहे.