शिंदे फडणवीस सरकारच्या स्थापनेच्या महिनाभरानंतर मंत्रीमंडळ विस्तार झाला. विस्तारानंतर खातेवाटप करण्यात आलं. खातेवाटपाला होणाऱ्या विलंबामुळे विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत होती. मात्र, आता खातेवाटपानंतर आज राज्यातील नवनियुक्त मंत्र्यांना शासकीय बंगले / निवासस्थानाचे वाटप करण्यात आले आहे.
मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यावर आता कोणता बंगला कोणत्या मंत्र्याला मिळणार यावरुन चर्चा रंगत होती. तसेच सत्तांतरानंतर काही माजी मंत्र्यांनी बंगले रिकामे केले नव्हते. त्यामुळे नव्या मंत्र्यांना बंगले देण्यात अडचणी येत होत्या. अखेर अनेक बंगले रिकामे झाल्यानंतर नवनिर्वाचित मंत्र्यांना बंगल्यांचं वाटप करण्यात आलं आहे. मात्र, या मंत्र्यांना करण्यात आलेल्या बंगले वाटपात शिंदे गटाचे मंत्री दीपक केसकरांना मिळालेला बंगला सगळ्यात भारी असल्याचे बोलले जात आहे.
कोणाच्या वाट्याला कोणता बंगला
१. राहुल नार्वेकर, विधानसभा अध्यक्ष – शिवगिरी
२. राधाकृष्ण विखे-पाटील – रॉयलस्टोन
३. सुधीर मुनगंटीवार – पर्णकुटी
४. चंद्रकांत पाटील – अ-९ (लोहगड)
५. गिरीश महाजन – सेवासदन
६. गुलाबराव पाटील – जेतवन
७. संजय राठोड – शिवनेरी
८. सुरेश खाडे – ज्ञानेश्वरी
९. संदिपान भुमरे – ब-२ (रत्नसिंधू)
१०. उदय सामंत – मुक्तागिरी
११. रविंद्र चव्हाण – अ – ६ (रायगड)
१२. अब्दुल सत्तार – ब – ७ (पन्हाळगड)
१३. दीपक केसरकर – रामटेक
१४. अतुल सावे – अ – ३ (शिवगड)
१५. शंभूराज देसाई – ब – ४ (पावनगड)
१६. मंगलप्रभात लोढा – ब – १ (सिंहगड)
मंत्री महोदयांनी पदावरुन मुक्त झाल्यावर त्यांना वाटप केलेले निवासस्थान पंधरा दिवसांच्या कालावधीत रिक्त करुन देणे बंधनकारक राहील, असेही शासन निर्णयात म्हटलं आहे.
मंत्रीमंडळात महिलांना स्थान मिळणार
मंत्रीमंडळ विस्तारादम्यान शिंदे गटातील ९ तर भाजपच्या ९ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या १८ मंत्र्यांमध्ये एकाही महिला आमदाराला स्थान मिळालं नाही. त्यावरुन विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. त्यानंतर आता शिंदे-फडणवीस यांच्या मंत्रीमंडळात महिलांना स्थान मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. दोन महिला आमदारांना मंत्रीपद दिलं जाणार आहे. एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रीपद दिलं जाणार असल्याची चर्चा आहे. देवयानी फरांदे, माधुरी मिसाळ, मनिषा चौधरी आणि सीमा हिरे यांच्या नावाची चर्चा सुरु आहे.