यंदाच्या गुरुपौर्णिमा उत्सवात साईदरबारी आलेल्या लाखो भाविकांनी जवळपास साडेचार कोटींची दक्षिणा अर्पण केली. गेल्या वर्षीच्या गुरुपौर्णिमा उत्सवातील देणगीपेक्षा हा आकडा जवळपास एकोणचाळीस लाखांनी अधिक आहे.
यंदा दुष्काळाचे सावट व गेल्या काही दिवसांपासून शंकरचार्य स्वामी स्वरूपानंद यांनी साईबाबांवर केलेले आरोपांचे सत्र चालू असतानाही साईभक्तांनी शिर्डीत विक्रमी गर्दी केली. नुकत्याच झालेल्या तीन दिवसांच्या गुरुपौर्णिमा उत्सवकाळातील दक्षिणापेटय़ांची मंगळवारी मोजणी करण्यात आली. यात दक्षिणापेटीत २ कोटी ९३ लाख ६७ हजार रुपयांची रोकड, २१० ग्रॅम सोने व ४ किलो ५६५ ग्रॅम चांदी निघाली. तसेच भाविकांनी देणगी काऊंटरवरही १ कोटी ४० लाख ८१ हजार रुपये जमा केले. एवढेच नव्हेतर शिर्डीत येऊ न शकणाऱ्या भाविकांनी ऑनलाइन सेवेच्या माध्यमातून ६ लाखांची देणगी बाबांना पाठविली. या सर्व देणगीची एकत्रित किंमत जवळपास ४ कोटी ४७ लाख रुपये आहे.
गेल्या वर्षीच्या गुरुपौर्णिमा उत्सवात दक्षिणापेटीत २ कोटी ६० लाख ७१ हजार रुपयांची रोकड, १७८ ग्रॅम सोने तर ७ किलो ८०० ग्रॅम चांदी मिळाली. याशिवाय देणगी काऊंटरवर १ कोटी ३७ लाख ३८ हजार रुपये जमा झाले होते. ऑनलाइन देणगीद्वारे जवळपास ४ लाख ५० हजार रुपये संस्थान तिजोरीत जमा झाले होते. या सर्वाची एकत्रित रक्कम ४ कोटी ९ लाख रुपये होती असे मुख्य लेखापाल झिरपे यांनी सांगितले.

Story img Loader