दिगबंर शिंदे, लोकसत्ता
सांगली : पोटाच्या आगीसाठी स्थलांतरित होणाऱ्या ऊसतोडकऱ्याच्या मुलांची शाळा आणि त्यासोबतच शिक्षण सुटू नये यासाठी शाळेने शिक्षणाबरोबरच मुलांना स्वयंपाक बनवण्याचे ज्ञान द्यायला सुरुवात केली. यातूनच भाकर स्वहस्ते तयार करण्याच्या अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. जत तालुक्यातील कुलाळवाडीच्या जिल्हा परिषद शाळेतील या उपक्रमाने शाळेतील विद्यार्थ्यांची गळती तर थांबलीच पण मुलेही स्वावलंबी बनली.
शिवकालात आदिलशाहीची राजधानी असलेल्या विजापूरपासून २० किलोमीटर सांगली जिल्ह्याच्या सीमेवर असलेले १ हजार ५९४ लोकवस्तीचे कुलाळवाडी गाव. या गावातील बहुतांश लोक दसऱ्याच्या मुहूर्तावर ऊसतोडीसाठी स्थलांतर करतात. यामुळे मुलांचीही कबिल्याबरोबर फरपट ठरलेली असायची. यामुळे शाळेतील संख्या रोडावत होती. यामागील कारणांचा शोध घेण्याचा प्रयत्न येथील शिक्षक भक्तराज गर्जे यांनी केला. यातून असे लक्षात आले, की आईवडील ऊसतोडीला गेल्यानंतर घरी कुणीतरी एखादी व्यक्ती, त्यातही एखादी वृद्ध व्यक्ती राहते. मग या व्यक्तींना ही मुळे सांभाळणे त्याअर्थाने जड जाते. या मुलांसाठी वसतिगृहाची सुविधा उपलब्ध नसल्याने त्याप्रकारची सोयदेखील उपलब्ध होत नाही. मग ही मुलेही मधेच शाळा सोडून देत आईवडिलांबरोबरच हंगामावर रवाना होतात. दसऱ्याला गेलेली ही मुले कारखान्याचा हंगाम संपेपर्यंत गावी परतत नाहीत. यामुळे त्यांची शाळा आणि शिक्षण दोन्हीही सुटते.
गावातील मुलांच्या या शाळा गळतीतील मोठे प्रमाण लक्षात आल्यावर या शाळेतील शिक्षकांनी मुलांना स्वावलंबी करत त्यांच्या घरातील एखाद-दुसऱ्या व्यक्तीसोबत राहण्यासाठी कंबर कसली. यामध्ये शाळेत येणाऱ्या तिसरीच्या पुढील मुलांची निवड करण्यात आली. त्यांना घरकाम शिकवले. मात्र सर्वात कठीण काम हे भाकरी बनवण्याचे असल्याचे लक्षात येताच शिक्षकांनी यासाठी स्पर्धा घेण्याचे ठरवले. या साठी शाळेतील शिक्षिकांनी मुलांना मार्गदर्शन सुरू केले. या स्पर्धा वर्षांतून स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनापूर्वी आयोजित करून विजेत्यांना बक्षिसेही दिली जाऊ लागली. यासाठी पन्नास गुण पाच निकषावर देण्यात येतात. यामध्ये स्वच्छता, साहित्याची हाताळणी, नीटनेटकेपणा, भाकरीचा आकार आणि चव या निकषावर स्पर्धकांचे मूल्यमापन करण्यात येते. या परिसरात बाजरीचा वापर रोजच्या आहारात अधिक असल्याने बाजरीची भाकरी आणि तीसुध्दा चुलीवरच करण्यास सांगण्यात येते.
९० विद्यार्थी यशस्वी
भाकरी करीत असताना शाळेतील शिक्षिका सोनीला वनखंडे यांच्यासह मुलींचे मार्गदर्शन घेण्याची सवलत मात्र स्पर्धकांना आहे. आतापर्यंत ९० मुले भाकरी करण्याची कला शिकून बाहेर पडली. या सर्व मुलांना केवळ भाकरी येऊ लागल्याने त्यांची शाळेतील गळती आणि त्याबरोबरच शिक्षणातील गळती देखील थांबली. आता ही सर्व मुले शिक्षणाच्या पुढच्या प्रवासाला लागलेली असली तरी त्यांच्यातील ही भाकरीची कला आता त्यांना कायम सोबत करत आहे. सांगलीचे तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनीही शाळेस भेट देऊन या उपक्रमाचे कौतुक केले होते.