कराड: राष्ट्रीय नेते शरद पवार हे उद्या सोमवारी कराडला येणार असून, माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेणार असल्याची माहिती देताना, शरद पवारांची जी भूमिका तीच आपलीही भूमिका असल्याचे ‘कराड उत्तर’चे आमदार व माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून अजित पवारांसोबत बहुसंख्य आमदार राज्यातील भाजप-शिवसेना युती सरकारमध्ये सहभागी झाले. या वेळी अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसह एकूण नऊ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यात आमदार बाळासाहेब पाटील अजित पवारांसोबत गेले का? असा प्रश्न भेडसावत असतानाच बाळासाहेबांनी माध्यम प्रतिनिधींना बोलावून आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांचा कराड उत्तर या मतदारसंघाचे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि ज्येष्ठ नेते पी. डी. पाटील यांनी प्रतिनिधित्व केले आहे. पी. डी. पाटील हे सन १९९५ च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आले. यानंतर शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखालील युतीच्या मंत्रिमंडळाला पी. डी. पाटील यांनी पाठींबा द्यावा आणि सहकारमंत्री म्हणून पदभार स्वीकारावा यासाठी या सरकारमधील नेत्यांनी प्रयत्न केले. सहकार खात्याचे कॅबिनेटमंत्रीपद राखूनही ठेवले. परंतु, यशवंत निष्ठेशी बांधिलकी जपत पी. डी. पाटील यांनी ती संधी डावलली होती. आजही त्यांचे पुत्र आमदार बाळासाहेब पाटील हेही यशवंत विचाराशी नाळ घट्ट असल्याचे दाखवून देत आहेत. अजित पवारांचे निकटवर्तीय म्हणून बाळासाहेब त्यांच्यासोबतच गेले असावेत अशी चर्चा सर्वत्र सुरु होती. परंतु, शरद पवारांच्या भूमिकेशी बिलकुल फारकत नसल्याचे बाळासाहेबांनी स्पष्ट केले आहेत.
आणखी वाचा-एक वर्षापूर्वीच जयंत पाटलांनी अजित पवार यांना दिली होती ‘ही’ ऑफर, म्हणाले होते “तुम्हीच…”
पत्रकारांशी बोलताना आमदार पाटील म्हणाले की, आपल्याला कुणीही संपर्क केलेला नाही. पण, राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते आज राजभवनात मंत्री म्हणून शपथ घेताना दूरदर्शनवर पाहिले. दीर्घकाळ शरद पवारांबरोबर असलेले नेते आता अजितदादांबरोबर आहेत. एकंदर ही जी वाटचाल आहे त्याची अनेक दिवसांपासून चर्चा होती. मुळात अनेकांना सत्तेत जावेसे वाटते त्याप्रमाणे काही मंडळी गेलेली दिसतात असे ते म्हणाले.
एकंदर हालचाली आणि राजभवनातील तयारी पाहताच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री अनेक दिवस मंत्रीमंडळ विस्तार लवकरच होणार असे सांगत होते. त्या मंत्रिमंडळाचा विस्तार त्याठिकाणी होईल असे पहिल्यांदा वाटले. परंतु, आज तिथे अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यासहित नऊ जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या या नऊ जणांच्या शपथविधीबाबत आपण अनभिज्ञ असल्याचा निर्वाळाच बाळासाहेब पाटील यांनी दिला. आजची घडामोड आणि निर्णय एवढ्या गडबडीने होईल असे कोणालाही वाटले नसावे असेही ते म्हणाले.
आणखी वाचा-अजित पवारांच्या बंडखोरीवर बाळासाहेब थोरातांची प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवादीचे मोठे नेते…”
शरद पवार काय बोलणार?
सातारमध्ये उद्या सोमवारी रयत शिक्षण संस्थेच्या सभेसाठी येणारे संस्थाध्यक्ष शरद पवार हे यापूर्वी कराडमध्ये दिवंगत ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत. राज्यातील राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर येथे पवार माध्यमांसमोर काय बोलणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. यशवंतरावांचे राजकीय वारसदार म्हणून शरद पवारांकडे पाहिले जाते. आणि आजच्या विलक्षण राजकीय परिस्थितीत पवार हे यशवंतराव चव्हाणांच्या समाधीच्या दर्शनाला येत आहेत. खरेतर यशवंतरावांची जयंती व पुण्यतिथीलाच पवार इथे येत असतात. मात्र, उद्या राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचे समाधीस्थळी येणे हे राजकीय वर्तुळाच्या नजरा खिळवून ठेवणारे आहे. त्यात पवारसाहेब काय बोलणार याची एकच चर्चा सर्वदूर राहिली आहे.