|| निखिल मेस्त्री
ग्रामीण भागात ऑनलाइन शिक्षणाला पर्याय
पालघर : पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात इंटरनेट व तत्सम सुविधा नसलेल्या प्राथमिक विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या बोलक्या शाळेला चांगला प्रतिसाद मिळत असून ही शाळा या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. पालघर जिल्ह्यातील सफाळा परिसरात लायन्स क्लब ऑफ सफाळे व दिगंत स्वराज फाऊंडेशन यांच्या माध्यमातून बोलकी शाळा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी सुरू केला आहे.
टाळेबंदी ते आतापर्यंत करोनाचा प्रादुर्भाव असल्याने शाळा बंद ठेवल्या असल्याने ऑनलाइन शैक्षणिक धडे देण्याचे कार्य शिक्षकांमार्फत सुरू असले तरी ग्रामीणबहुल भागातील आर्थिक स्थिती नसलेल्या व इंटरनेट व अद्ययावत मोबाइल सुविधा उपलब्ध नसल्याने त्यांना हे शिक्षण घेणे कठीण होऊन बसले होते. यादरम्यान काही तालुक्यात काही शिक्षकांच्या गटाने शैक्षणिक पाठ्यक्रमावर आधारित उपक्रम राबविण्यास सुरुवात केली होती. त्याद्वारे प्राथमिक कक्षेच्या ग्रामीण विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य सुरू होते. मात्र काही भाग व तेथील विद्यार्थी यापासून दुरावले होते. हे लक्षात घेत नावीन्यपूर्ण उपक्रमातून ध्वनिफितीद्वारे मनोरंजन व शिक्षण देण्याची संकल्पना लायन्स क्लब ऑफ सफाळे व स्वराज फाऊंडेशन यांच्या माध्यमातून पुढे आली. हळूहळू ही संकल्पना वाढू लागली. लहान विद्यार्थी या संकल्पनेतून आनंद लुटू लागले. हे लक्षात घेत या संकल्पनेचा विस्तार झाला व हे आगळेवेगळे ज्ञानदान यशस्वी ठरले.
विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात टिकून राहावेत म्हणून स्वराज फाऊंडेशन यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील प्रथम जव्हार आणि मोखाडा भागातील काही गाव-पाड्यांमध्ये बोलकी शाळा हा उपक्रम राबवण्यास सुरुवात केली.
ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून शिक्षण
बोलकी शाळा उपक्रमात विद्यार्थ्यांना त्यांचा अभ्यासक्रम ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून शिकवला जात आहे. ऑनलाइन शिक्षणासाठी लागणाऱ्या मोबाइल, लॅपटॉप, संगणक आदी साहित्याची गरज लागत नाही. शाळा ही घराच्या आवारात अथवा मोकळ्या मैदानामध्ये भरवली जात आहे. यासाठी इयत्ता पहिली ते सातवीचा अभ्यासक्रम ध्वनीस्वरूपात तीन गटांमध्ये तयार करण्यात आला आहे. पहिला बालवाडी, दुसरा पहिली ते चौथी तर तिसरा पाचवी ते सातवी असे तीन गट आहेत. या विद्यार्थ्यांचे नियोजन वरच्या वर्गातील विद्यार्थी करतात. विविध खेळ आणि मनोरंजन याचा यामध्ये समावेश आहे. पाठांतर याचबरोबरीने विद्यार्थ्यांना कृती करण्याच्या सूचनाही ध्वनिफितीत दिल्या जात आहेत, असे शिक्षक प्रमोद पाटील यांनी सांगितले