नांदेड: मागील काही महिन्यांपासून भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षापासूनचे आपले सहकारी अमरनाथ राजूरकर यांचे विधान परिषदेच्या माध्यमातून राजकीय पुनर्वसन करण्यासाठी केलेले प्रयत्न अयशस्वी ठरल्याचे रविवारी स्पष्ट झाले.

राज्य विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी येत्या २७ मार्चला होणार्‍या निवडणुकीतील भाजपाच्या तीन उमेदवारांची नावे दिल्लीतून जाहीर करण्यात आली. त्यांतील माजी आमदार दादाराव केचे व संदीप जोशी हे दोघे विदर्भातील तर संजय केनेकर हे छ. संभाजीनगरातील पक्ष संघटनेतील सक्रिय कार्यकर्ते आहेत.

वरील निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर भाजपातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यांत पक्षाच्या जुन्या-निष्ठावान कार्यकर्त्यांसोबत नव्याने आलेल्यांचाही समावेश होता. खा.अशोक चव्हाण यांनी नांदेडमधील आपले सहकारी, माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांच्या नावाची पक्षाकडे शिफारस केली होती. दिल्लीतील काही प्रमुख नेत्यांकडेही त्यांनी शब्द टाकला होता. पण त्यांच्या शब्दाचा मान राखला गेला नाही.

अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशास एक वर्ष उलटले आहे. पक्षप्रवेशावेळीच त्यांना राज्यसभेवर घेऊन त्यांचे स्वागत करण्यात आले होते. पण गेल्या वर्षभरात नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपाचा दोनदा पराभव झाला. चव्हाण यांच्यासारख्या अनुभवी व प्रभावशाली नेत्याला पक्षात घेतल्यावरही अपयश यावे, ही बाब भाजपा नेतृत्वाला खटकली असल्याचे पक्षातून सांगितले जात होतेच.

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर चव्हाण यांनी भोकर मतदारसंघातून आपल्या कन्येला विधानसभेवर निवडून आणले. या निवडणुकीत भोकर तालुक्यातील संपूर्ण नियोजनाची जबाबदारी राजूरकर यांनी सांभाळली होती. स्वतः चव्हाण यांनी इतर कोणत्याही मतदारसंघांमध्ये लक्ष न घालता केवळ भोकरवर लक्ष केंद्रित करून मुलीला निवडून आणले. पण त्याचवेळी लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या उमेदवाराचा पराभव झाल्याची बाब राज्य तसेच केंद्रीय पातळीवरील नेत्यांनी गंभीरपणे घेतली होती. चव्हाण यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान न मिळण्यामागे हे एक प्रमुख कारण सांगितले गेले.

आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा विचार करून भाजपाने पक्षाच्या नांदेड महानगर कार्याध्यक्षपदाची जबाबदारी राजूरकर यांच्यावर सोपविली. ही जबाबदारी सांभाळत असतानाच विधान परिषदेच्या रिक्त जागांची निवडणूक जाहीर झाल्यानंतर पक्षाच्या उमेदवारीसाठी नांदेडमधून चैतन्यबापू देशमुख आणि राजूरकर यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. पण वर्षभरापूर्वी नांदेडमधून अशोक चव्हाण यांच्यासह अजित गोपछडे यांना राज्यसभेवर घेण्यात आल्यामुळे विधान परिषदेसाठी नांदेडमधून कोणालाही संधी मिळणार नाही, असे काही जाणकारांचे म्हणणे होते. तेच शेवटी खरे ठरले.

भाजपाने आता ज्या तिघांना विधान परिषदेची उमेदवारी दिली त्यांचे पक्ष संघटनेत भरीव योगदान राहिले आहे. विधान परिषद किंवा राज्य सभेचे उमेदवार ठरवितांना भाजपाने आतापर्यंत पक्ष संघटनेत योगदान देणार्‍यांनाच प्राधान्य दिल्याचे दिसते. अशोक चव्हाण यांच्यासोबत काँगे्रसमधल्या त्यांच्या अनेक सहकार्‍यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांतील काहींना भाजपाकडून पक्ष संघटनेतील वेगवेगळी पदे बहाल करण्यात आली. राजूरकर यांनी त्यापुढची पायरी गाठण्याचा म्हणजेच विधान परिषदेत जाण्याचा प्रयत्न केला. देवेन्द्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे इत्यादी नेत्यांपर्यंत त्यांनी धाव घेतली. पण रविवारी जाहीर झालेल्या यादीमध्ये अन्य नावे पाहून त्यांनी शेवटी भाजपातल्या शिस्तीला अनुसरून या सर्वांच्या अभिनंदनाचा सोपस्कार पूर्ण केला.

Story img Loader