सांगली : मध्यमवर्गीय कुटुंबाचे साजेशा घराबरोबर चारचाकी स्वमालकीची असावी असे स्वप्न असतेच. पण काळ्या आईवर जीवापाड प्रेम असलेल्या शेतकऱ्याचे दावणीला चार जनावरे असावीत ही इच्छा असतेच. त्यात दावणीला माणदेशी खिलार खोंड म्हणजे सोने पे सुहागा. बैलगाडी शर्यतीला मान्यता मिळताच खिलार खोंड पाळण्याची इच्छा बळावली. अशाच एका शौकिन शेतकऱ्यांने खिलार खोंडासाठी चक्क चारचाकी मोटारीची किंमत मोजली.
आटपाडीतल्या जातीवंत माणदेशी खिलार खोंडास पहिल्यापासूनच बाजारात जास्त मागणी आहे. बैलगाडी शर्यती सुरू झाल्यापासून तर खोंड सांभाळणाऱ्या शेतकऱ्यांना आणि त्यांच्या खोंडाना अधिकच अच्छे दिन आलेत. याचाच प्रत्यय आटपाडीमध्ये विक्री झालेल्या एका खिलारी खोंडाच्या विक्रीच्या किंमती मधून दिसून आलाय.
आटपाडी मध्ये चारचाकी गाडीच्या किंमतीला खोंड विकला गेला. जातिवंत माणदेशी खिलार खोंडास ५ लाख ११ हजार रुपये किंमत मिळालेय. यामुळे माणदेशी खिलार खोंड चर्चेत आला आहे. खिलार गाईच्या खोंडाला ५ लाख ११ हजाराचे आल्याने आटपाडी तालुक्यासह संपूर्ण माणदेशात आश्चर्ययुक्त समाधान व्यक्त होत आहे. संताजी जाधव यांचा हा २६ महिन्यांचा खोंड असून तो विटा येथील प्रणव हरुगडे यांनी विक्रमी किमतीस विकत घेतलाय.