शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली आहे. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी प्रचाराचा नारळ फोडला आहे. त्यामुळे अंबादास दानवे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. चंद्रकांत खैरे मला सातत्याने डावलत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे गटात आणखी एक राजकीय भूकंप होणार का? या चर्चा रंगल्या आहेत.
अंबादास दानवे यांनी काय म्हटलं आहे?
“मी मागच्या दहा वर्षांपासून लोकसभा लढवण्यासाठी इच्छुक आहे. मी माझी इच्छा लपवून ठेवलेली नाही. पक्षप्रमुखांनाही हे माहीत आहे. अजूनही कोणताही चेहरा त्यांनी दिलेला नाही. निर्णय घ्यायला अवधी आहे. मी इच्छा व्यक्त केली आहे. आता ते कुणाला उमेदवारी देणार ते पाहू. एकच बाजू चालत असेल आणि एकांगीपणे कुणी वागत असेल तर त्याची दखल उद्धव ठाकरेंनी घेतली पाहिजे. चंद्रकांत खैरे मला कायम डावलत असतात, ही गोष्ट आजची नाही. मी चंद्रकांत खैरेंसाठी पक्षाचं काम करत नाही उद्धव ठाकरेंसाठी काम करतो. खैरे काय म्हणतात, माझ्याविषयी काय बोलतात त्याच्याशी मला काहीही घेणंदेणं नाही. ” असं अंबादास दानवेंनी म्हटलं आहे.
भूकंप वगैरे काहीही नाही
अंबादास दानवे पुढे म्हणाले मी उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहे. भूकंप वगैरे कुणी म्हणत असेल तर जे म्हणत आहेत त्यांना विचारा. या सगळ्या गोष्टींना अर्थ नाही असं मी तुम्हाला सांगतो असंही अंबादास दानवे म्हणाले. नाराज असलो तरीही एकनाथ शिंदेंबरोबर जाणार नाही असं अंबादास दानवेंनी स्पष्ट केलं आहे.
शिंदे सेनेबरोबर जाणार नाही
लोकसभेसाठी उमेदवारी हवी आहे हे तर मी उद्धव ठाकरेंना सांगितलं आहे. मागच्या दोन्हीवेळा मी हे सांगितलं होतं. मी पक्षाचा सैनिक आहे. समजा खैरेंना उमेदवारी दिली तरीही मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं काम मी करेन. मागच्यावेळीही तिकिट मिळालं नव्हतं तरीही निवडणूक प्रमुख म्हणून मी काम केलं आहे. काहीही झालं तरीही मी एकनाथ शिंदेंबरोबर जाणार नाही असंही अंबादास दानवेंनी स्पष्ट केलं आहे.