शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी पार पडत आहे. शिवसेना ( ठाकरे गट ) वकील देवदत्त कामत यांच्याकडून शिंदे गटातील आमदार भरत गोगावले यांची उलटतपासणी पार पडली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज सुरतला गेले, म्हणून मी गेलो, असं उत्तर गोगावलेंनी दिलं आहे. यावरून नव्या वादाला तोंड फुटलं आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही गोगावलेंवर सडकून टीका केली आहे.
भरत गोगावले काय म्हणाले?
वकील देवदत्त कामत यांनी ‘तुम्ही सुरतला कशासाठी गेला होता?’ असा प्रश्न भरत गोगावलेंना विचारण्यात आला. त्यावर “छत्रपती शिवाजी महाराज सुरतला गेले होते, म्हणून मी गेलो होतो,” असं उत्तर दिलं गोगावलेंनी दिलं.
“गोगावलेंनी कुणाचं नाक कापलं?”
गोगावलेंच्या वक्तव्यावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज औरंगाजेबाचं आणि इंग्रजांचं नाक कापायला सुरतला गेले होते. भरत गोगावलेंनी कुणाचं नाक कापलं? छत्रपती शिवाजी महाराज मर्दासारखे सुरतला गेले होते. गोगावले गद्दारी करून गेले.”
“हे स्वराज्य विकणारे गद्दार आहेत”
“छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर तुलना करण्याएवढे गोगावले मोठं आहेत का? हे सगळे सुर्याजी पिसाळ, खंडोजी खोपडे आहेत. शिवाजी महाराजांच्या नखाएवढी तुमची बरोबरी होऊ शकत नाही. तेवढी तुमची लायकीही नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान यांनी केला आहे. हे स्वराज्य विकणारे गद्दार आहेत,” अशी टीका अंबादास दानवेंनी गोगावलेंवर केली आहे.