छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी उमेदवारी मिळावी, यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि उबाठा गटाचे नेते अंबादास दानवे प्रयत्नशील होते. मात्र दानवेंचे कट्टर विरोधक मानले जाणाऱ्या चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी दिल्यानंतर दानवे नाराज असल्याची चर्चा सुरू होती. त्यातच आज ते भाजपात प्रवेश करणार असल्याच्या वावड्या उठल्या. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही माध्यमांशी बोलताना दानवे पक्षप्रवेश करतील, असे संकेत देणारे विधान केले होते. मात्र त्यानंतर स्वतः अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेऊन यावर स्पष्ट भूमिका मांडली.
पत्रकार परिषद घेत असताना अंबादास दानवे यांनी वृत्तवाहिन्यावर आपली नाराजी प्रकट केली. माझ्या पक्षप्रवेशाच्या खोट्या बातम्या पसरविल्या जात आहेत. ज्यांनी बिनबुडाचे वृत्त दिले, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची चाचपणी करत आहे, असेही संकेत त्यांनी दिले. तसेच मी सच्चा शिवसैनिक असून शिवसेना ठाकरे गटातून बाहेर पडणार नाही, असेही ते म्हणाले. उबाठा गटात नाराजी असल्याबाबत ते म्हणाले की, लोकसभेची यादी जाहीर होईपर्यंत मी नक्कीच नाराज होतो. मला उमेदवारी मिळावी, यासाठी माझा प्रयत्न होता. पण ज्याक्षणी पक्षनेतृत्वाने निर्णय घेतला. त्याचवेळी माझी नाराजी संपुष्टात आली. मी आता जोमाने खैरेंचा प्रचार करणार आहे, असेही ते म्हणाले.
विचार एक असले म्हणून काय झालं?
भाजपा नेते रावसाहेब दानवे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, अंबादास दानवे आणि भाजपा यांचे विचार एकच आहेत. त्यामुळे ते आमच्याबरोबर येतील, असा आम्हाला विश्वास आहे. दानवे यांच्या दाव्याबाबत बोलताना अंबादास दानवे म्हणाले की, शिवसेना-भाजपा यांची २५ वर्ष युती होती. विचार जुळत असल्यामुळेच ही युती होती ना? आज आमच्या भूमिका वेगळ्या आहेत, म्हणून आम्ही वेगळे झालो. पण विचार एकच आहेत, त्यामुळे मी पक्ष सोडून भाजपात जावे, असे काही नाही. आमची स्वतंत्र विचारधारा आहे, शिवसेनेचा स्वतंत्र बाणा आहे, त्या बाण्यावर आमची वाटचाल सुरू आहे.
आठ दिवसांत लोकसभा मतदारसंघ ढवळून काढणार
लोकसभा निवडणुकीसाठी चंद्रकांत खैरेंचा प्रचार करण्याबाबत दानवे म्हणाले की, हा मतदारसंघ फार मोठा नाही. आठ दिवसांत संपूर्ण मतदारसंघ ढवळून काढू. आमची संघटना तळागाळात आहे. बूथस्तरापर्यंत कार्यकर्त्यांचे जाळे आहे. त्यामुळे एकदा प्रचारात उतरलो की, आठ दिवसांत प्रचार करू. तसेच मी स्टार प्रचारक असल्यामुळे मला महाराष्ट्रात इतर ठिकाणीही प्रचारासाठी जायचे आहे.