ठाकरे गट आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील युती जास्त काळ टिकणार नाही. भविष्यात उद्धव ठाकरे एमआयएमशीही युती करू शकतात, असे वक्तव्य भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. या विधानानंतर बावनकुळे यांना विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी चोख शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. भाजप एमआयएमचा स्वत:ची बी टीम म्हणून वापर करते. वंचित आणि ठाकरे गट यांच्यातील युतीमुळे आगामी काळात महाराष्ट्रात सामाजिक, राजकीय परिवर्तन घडणार आहे, असे दानवे म्हणाले आहेत.
हेही वाचा >> शिवसेनेत बंड होणार याची कल्पना होती? संजय राऊतांचे महत्त्वाचे विधान; म्हणाले, “पळून जाऊनच लग्न…”
तुम्ही प्रकाश आंबेडकर यांना कमी लेखता का
“असदुद्दीन ओवैसी आणि भारतीय जनता पार्टीची युती आहे हे बिहार, उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीतून दिसून आलेले आहे. भारतीय जनता पार्टी पक्ष स्वत:ची बी टीम म्हणून ओवैसी यांना वापरत आलेला आहे. तुम्ही प्रकाश आंबेडकर यांना कमी लेखता. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. वैचारिक मतभेत असू शकतो. त्यांनी त्या-त्या वेळेस तो केला असेल. आम्हीही त्यांना विरोध केला असेल. मात्र हा विरोध कायम असाच ठेवायचा का. हा विरोध सोडून पुढे काही करायचे नाही का? म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे,” असे अंबादास दानवे म्हणाले.
“राजकीयच नव्हे तर सामाजिक परिवर्तनही गरजेचे आहे. याच कारणामुळे आगामी काळात ही युती राज्यात परिवर्तन घडवून आणणार,” असेही अंबादास दानवे म्हणाले. पुढील निवडणुकीला महाविकास आघाडीला उमेदवारही मिळणार नाहीत, असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला होता. त्यावर बोलताना तुम्ही आमच्या पक्षाची चिंता करू नका, असा सल्लाही दानवे यांनी बावनकुळे यांना केला.