सध्या विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु असून अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधक विविध मुद्यांवरून आमने-सामने येत असल्याचं पाहायला मिळत आहे. विविध अनेक मुद्यांवरून विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. सोमवारी विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांच्यावर शिवीगाळ केल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात प्रसाद लाड यांनी अंबादास दानवे यांनी सभागृहाची माफी मागावी, तसेच राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. यावर आता अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया देत भाजपाने कायदे किंवा नियम शिकवण्याची गरज नाही, अशा शब्दांत प्रत्त्युत्तर दिलं आहे. तसेच आमदार प्रसाद लाड बाहेर भेटले असते तर काय केलं असतं? असा प्रश्न विचारण्यात आला असता प्रसाद दिला असता असं आंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंबादास दानवे काय म्हणाले?

“भारतीय जनता पार्टीने नियम आणि कायदे शिकवण्याची गरज नाही. भारतीय जनता पक्षाने राहुल गांधींना आणि १५० खासदारांना संसदेमधून निलंबित केलं होतं. त्यामुळे भाजपाने संसदीय भाषा आणि नियम, कायदे उद्धव ठाकरे यांना आणि मला शिकवण्याची गरज नाही. प्रसाद लाड हे राजकारणात नवीन आहेत”, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं. आमदार प्रसाद लाड यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत तुमच्या राजीनाम्याची मागणी केली. यावर बोलताना दानवे म्हणाले, “मला वाटतं या ठिकाणी राजीनाम्याची मागणी करून काय होणार? त्यांनी न्यायालयात जावं. आता त्यांना काय करायचं ते करुद्या. कारण त्यांना कायदे आणि संविधान आता आठवायला लागले आहेत. आतापर्यंत भाजपाला कायदे म्हणजे त्यांच्या घरची जहांगिरी किंवा त्यांच्या घरी पाणी भरणारे वाटत होते. पण आता त्यांना कायद्याची जाणीव झाली हे चांगलं आहे”, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली.

हेही वाचा : “…तर मी राजीनामा देतो”, सभागृहातील गोंधळासंदर्भात बोलताना अंबादास दानवेंचं विधान

विधानपरिषदेत झालेल्या गोंधळाबाबत उद्धव ठाकरे यांनी काही संवाद साधला का? यावर अंबादास दानवे यांनी सांगितलं, “मला वाटतं की, अशा प्रकारच्या सूचना किंवा बोलणं सर्वांसमोर सांगाच्या नसतात. हिंदुत्व हे प्रसाद लाड यांच्या सारखे माणसं शिकवतात? ते व्यवसायासाठी ज्या ठिकाणी सत्ता आहे तिकडे जातात. तसं आम्ही करत नाहीत. मग हे लोकं काय हिंदुत्व शिकवणार? त्यांना हिंदुत्व काय माहिती? सभागृहात बोलताना सभापतींशी बोललं पाहिजे. माझ्याशी बोलून काय उपयोग? माझ्याकडे बोट दाखवून बोलण्याची गरज नव्हती. विरोधी पक्षनेता हा आक्रमक असला पाहिजे”, असंही अंबादास दानवे माध्यमांशी बोलताना म्हणाले.

प्रसाद लाड बाहेर भेटले असते तर…

विधान परिषदेत झालेल्या गोंधळानंतर आता सभागृहात कसे सामोरं जाणारं? या प्रश्नावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले, “आम्ही सभागृहात जाऊ. त्यात काय घाबरायचं? त्यांना निलंबन करायचं असेल तर करून टाका. मी शिवसैनिक आहे मला काही फरक पडत नाही. यापुढेही भूमिका अशीच राहिल. तरीही ते (प्रसाद लाड) सभागृहात होते. बाहेर असते तर आणखी काही झालं असतं. या लोकांनी प्रतिष्ठा खराब केली. १५० लोकांना यांनी संसदेतून निलंबित केलं होतं. मग यांनी काय संसदेची प्रतिष्ठा ठेवली होती का?”, असा हल्लाबोल आंबादास दानवे यांनी केला. प्रसाद लाड बाहेर भेटले असते तर काय केलं असतं? असं विचारण्यात आलं असता आंबादास दानवे यांनी उत्तर देत “प्रसाद दिला असता”, असं म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ambadas danve criticism to bjp mla prasad lad in maharashtra vidhan parishad monsoon session gkt