शिंदे गटातील आमदार संदीपान भुमरे यांनी औरंगाबादच्या पैठणमध्ये सभेत बोलताना मोठा दावा केला आहे. उद्धव ठाकरेंसोबतचे आमदार आपल्या संपर्कात असल्याचं मोठं वक्तव्य संदीपान भुमरेंनी केलं आहे. भुमरे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. भूमरे यांच्या या दाव्यावर शिवसेना आमदार अंबादास दानवे यांनी टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा- नितीन गडकरींच्या मागे कोण लागलं आहे? राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

दानवेंची भूमरेंवर टीका

“पैठणमधील भूमरेंच्या कार्यक्रमाला ५० लोकही नव्हते. अनेक खुर्च्या ऱिकाम्या होत्या. त्यामुळे आधी स्वत:च सांभाळा” असं म्हणत दानवेंनी भूमरेंना टोला लगावला आहे. एकनाथ शिंदे सरकारमध्ये मंत्री झाल्यानंतर संदीपान भुमरे पहिल्यांदाच पैठणमध्ये आले होते. मात्र, त्यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये असलेल्या रिकाम्या खुर्च्यांची शनिवारी दिवसभर चर्चा सुरू होती. बंडखोरांना जनतेनं नाकारल्याचं देखील बोललं जात होतं.

हेही वाचा- “राष्ट्रवादीमध्ये एक बोलबच्चन होते मियाँ….”, मोहीत कंबोज यांचं खोचक ट्वीट, रोहित पवारांना केलं लक्ष्य!

काय म्हणाले होते भूमरे

“उद्धव ठाकरेंकडे जे काही १०-१२ आमदार आहेत, त्यातले परवाच एक मला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटले. ते म्हणाले कसं करू साहेब.. मी म्हटलं काही हरकत नाही, या इकडे”, असं भुमरे म्हणाले होते. दरम्यान, संदीपान भुमरेंच्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. खरंच शिवसेनेतून अजून काही आमदार फुटणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ambadas danve criticize sandipan bhumre dpj