धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन जिल्ह्याच्या दौऱ्यावर येतात. दोन दिवस थांबतात व फोडाफोडीचे राजकारण करून धुळे जिल्हा परिषदेवर आपला अध्यक्ष बसवून निघून जातात. या सरकारमधील मंत्र्यांना सत्तेचा माज आला आहे, अशी घणाघाती टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षेनेते अंबादास दानवे यांनी केली. ते आज (१६ ऑक्टोबर) धुळे जिल्हा दौऱ्यावर अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी करण्यासाठी आले असताना पत्रकार परिषदेत बोलत होते.
हेही वाचा >>> मोठी बातमी! अंधेरी पोटनिवडणूक लढवू नका, राज ठाकरेंचं फडणवीसांना पत्र, म्हणाले “रमेश लटकेंच्या आत्म्याला…”
धुळे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले असताना शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तसेच शेतकरी आत्महत्यांचे त्यांना काहीच घेणे देणे नाही. या सरकारमधील मंत्र्यांना सत्तेचा माज आला आहे. अतिवृष्टी झाल्यानंतर पहिल्या टप्प्यातच शेतकऱ्यांना मदत दिली असती, तर आत्महत्येचे प्रमाण कमी झाले असते. मात्र राज्य सरकारने एन.डी.आर.एफ आणि एस.डी.आर.एफ यांच्या निकषावर मदत जाहीर केली. अद्यापही ही मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली. तसेच राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या आणखी किती आत्महत्या बघायच्या आहेत, असा प्रश्नदेखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.
हेही वाचा >> Andheri Bypoll: राज ठाकरेंनी अंधेरी निवडणूक न लढवण्याची विनंती केल्यानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
अंबादास दानवे यांनी राज्यातील शेतकरी आत्महत्या आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मदत या मुद्द्यांवरून शिंदे-भाजपा सरकारवर निशाणा साधला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजूनही व्यक्तिगत कामात दंग आहेत. सत्ताधाऱ्यांनी शेतकरी आत्महत्या तसेच नुकसान भरपाईच्या मुद्द्यावर विरोधकांशी चर्चा केलेली नाही. पंतप्रधान पीक विमा योजना ही शेतकऱ्यांना लुटणारी आहे. विमा कंपन्यांनी ९६ टक्के वाटा हा स्वत:च्या घशात घातलेला आहे. राज्य सरकारला बीड पॅटर्ननुसार पीक विमा योजना राबवण्यासाठी केंद्र सरकारने मान्यता द्यावी, अशी मागणीही दानवे यांनी केली.