वेदांन्ता फॉक्सकॉन सेमीकंडक्टरचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यामुळे शिंदे गट-भाजपा सरकारवर चौफेर टीका होत आहे. असे असताना राज्य सरकारने एमआयडीसी भूखंड वाटपाच्या स्थिगितीचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावरही विरोधक आक्रमक झाले आहेत. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यातील उद्योजक नाराज असल्याचे म्हणत शिंदे सरकारवर टीका केली आहे. तर दुसरीकडे दानवेंच्या या आरोपाला एकनाथ शिंदे यांनी प्रत्यूत्तर दिलं असून यापुढे कोणताही उद्योग राज्याबाहेर जाणार नाही. सर्व परवानग्या देण्यासाठी एक खिडकी योजना राबवण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहिती शिंदे यांनी दिली.
हेही वाचा>> माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन
अंबादास दानवे यांनी काय आरोप केला?
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे गट-भाजपा सरकारवर टीका केली आहे. ७५ दिवसांपासून उद्योग विभागात कोणतेही काम नाही. अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जात आहेत. सर्व फाईली थांबवल्या जात आहेत. सगळे निर्णय रद्द करण्यात आले आहेत. एमआयडीसीमध्ये भूखंड वितरण थांबवण्यात आले आहे. त्यासाठीचा एक शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. मुख्यमंत्री नाही म्हणत आहेत. मात्र त्या शासन निर्णयाची एक प्रत माझ्याकडे आहे. याच कारणामुळे राज्यातील उद्योगधंदे अन्य रांज्यात जात आहेत. बरेच उद्योजक नाराज आहेत, असे म्हणत दानवे यांनी शिंदे गट-भाजपा सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. तसेच दोन-तीन उद्योजकांचा मला कॉल आलेला आहे. याच्या तक्रारी दिल्लीपर्यंत करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याची दखल घेतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा>> “संभाजीनगरकरांच्या उरावर आधुनिक ‘सजा’कार..”, राज ठाकरेंचं मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त खुलं पत्र!
तर एकनाथ शिंदे यांनी दावने यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले. राज्यात जी गुंतवणूक येत आहे ती थांबू नये म्हणून एक खिडकी योजनेच्या माध्यमातून सर्व परवाने तसेच सोईसुविधा देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. उद्योगांना स्थगिती नव्हे तर जास्त सवलती देण्यात येत आहेत. पुढच्या काळात कुठलाही उद्योग राज्याबाहेर जाणार नाही. आगामी काळात जे उद्योग राज्यात येतील त्यांना राज्य सरकारकडून पूर्ण सहकार्य केलं जाईल, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले.