मुंबईतील बीकेसी मैदानावर बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्याला राज्यभरातील हजारो लोक उपस्थिती होते. या लोकांना सभास्थळी आणण्यासाठी शिंदे गटाकडून तब्बल १७९५ एसटी बसेस आरक्षित केल्या होत्या. यासाठी जवळपास १० कोटी रुपये खर्च करण्यात आले, असा आरोप शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
अंबादास दानवे यांनी कागदोपत्री तपशील देत सांगितलं की, शिंदे गटाकडून सुमारे १७९५ एसटी बसेस आरक्षित करण्यात आल्या होत्या. त्यासाठी मुंबई आगार व्यवस्थापकाकडे सुमारे ९ कोटी ९९ लाख ४० हजार ५०० रुपये रोख स्वरुपात जमा करण्यात आले होते. ही रक्कम ३ ऑक्टोबर २०२२ रोजी भरल्याचं मी सांगतोय. पण ते (शिंदे गट) नाकारतील. दसरा मेळाव्यानिमित्त १७९५ पैकी १६२५ बसेसचा वापर करण्यात आला. तर १७० बसेस रद्द झाल्या, असंही अंबादास दानवे म्हणाले.
हेही वाचा- “सनी देओल बेपत्ता आहे” लोकांनी शहरभर लावले पोस्टर, नेमकं काय घडलं?
मुंबई आगार व्यवस्थापकाकडे ही रक्कम कुणी भरली? याची एसटीने कुठे विचारपूस केली का? असा माझा प्रश्न आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याकडे ११ लाखांची रोख रक्कम आढळली होती, तर त्यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली. त्यामुळे आता एवढी मोठी रोख रक्कम भरणारी व्यक्ती समोर आली पाहिजे. ही रक्कम कोणी भरली? त्याचा उत्पन्नाचा स्त्रोत काय आहे? याची माहिती मी मागवली आहे, असंही दानवे म्हणाले.