Ambadas Danve : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं, तर महाविकास आघाडीला पराभवाचा धक्का बसला. राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं असून ५ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. सरकार स्थापन होऊन आठवडा झाला. मात्र, तरीही अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. महायुतीत मंत्रिपदावरून महायुतीत रस्सीखेच सुरु असल्याचं बोललं जात आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीतील तीन घटक पक्षांना मिळून फक्त ४६ जागा जिंकता आलेल्या आहेत. त्यामुळे विरोधकांना विरोधीपक्ष नेतेपद मिळणार की नाही? याबाबत संभ्रम आहे. पुरेशी संख्या नसतानाही शिवसेना ठाकरे गटापाठोपाठ काँग्रेसनेही या पदावर दावा केला आहे. त्यामुळे विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा रंगली आहे. आता यावर बोलताना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया देत महाविकास आघाडीच्या स्थरावर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.
अंबादास दानवे काय म्हणाले?
विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसने दावा सांगितल्याची चर्चा आहे. यावर बोलताना अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे की, “महाविकास आघाडीच्या स्थरावर निर्णय होईल. योग्य तो निर्णय घेतला जाईल. त्यामध्ये जो पक्ष निर्णय घेतो ते अंतिम असतं आणि ते सर्वांना मान्य असतं.” तुमच्या पदावर (विधानपरिषद विरोधी पक्षनेता) देखील काँग्रेसने दावा सांगितल्याचं बोललं जात आहे. यावर अंबादास दानवे म्हणाले, “मला माझं पद महत्वाचं आहे किंवा नाही याला काही महत्व नाही. पक्ष प्रमुख जे ठरवतील ते अंतिम असतं.”
काँग्रेसच्या गटनेतेपदाबाबत बोलताना अंबादास दानवे यांनी म्हटलं की, “गटनेता करणं हे ज्याच्या त्याच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. खरं तर गटनेता (काँग्रेसचा) निवडला नाही ही बातमी आहे. आता त्यांच्या पक्षाचा गटनेता कोण असावा हे ज्यांच्या-त्यांच्या पक्षाचा प्रश्न असतो. विधानपरिषदेत शिवसेनेच्या आमदारांची संख्या ८ आहे आणि काँग्रेसच्या आमदारांची सख्या ७ आहे. त्यामुळे या पदाचा (विधानपरिषद विरोधी पक्षनेता) काही विषय येत नाही”, असं त्यांनी म्हटलं.
विधानसभेतील विरोधीपक्षनेते पदावर तुमच्या पक्षाने (शिवसेना ठाकरे गट) दावा केल्याचं बोललं जात आहे. यावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले, “असं आहे की यासंदर्भातील फक्त मागणी केलेली आहे. मागणी केल्यानंतर सरकार आणि विधानसभेचे अध्यक्ष काय निर्णय घेतात? हे त्यावर सर्व अवलंबून आहे. आम्ही नागपूरच्या अधिवेशनात आमची भूमिका मांडू”, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.