महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होईन एक वर्ष पूर्ण झालं आहे. शिंदे-फडणवीस सरकारच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाकडून ‘जागतिक गद्दार दिन’ साजरा केला जात आहे. दरम्यान, भारतीय जनता पार्टीचे नेते आणि बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. महाविकास आघाडी सरकार पाडताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्लॅन कसा आखला? आणि याबाबत गुप्तता कशी पाळली होती? याचा सविस्तर खुलासा रवींद्र चव्हाण यांनी केला.
रवींद्र चव्हाण यांनी अलीकडेच एका मराठी वृत्तपत्राला मुलाखत दिली. त्यामध्ये चव्हाण यांनी एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीची योजना कशी आखली आणि ती अमलात कशी आणली याचा खुलासा केला. यावर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी ट्विटरद्वारे प्रतिक्रिया दिली. त्यांनी रवींद्र चव्हाण यांच्या मुलाखतीच्या बातमीचा स्क्रीनशॉट शेअर करत पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवर जोरदार हल्लाबोल केला.
हेही वाचा-“…याचा अर्थ अजितदादांची राष्ट्रावादीत जास्त घुसमट होतेय”, शिंदे गटाच्या नेत्याचं थेट विधान
अंबादास दानवे ट्वीटमध्ये म्हणाले, “द गद्दार फाईल्स: लोकशाही मार्गाने आलेलं सरकार कसं लबाडी करून मोदी-शाहांच्या भाजपाने पाडले, हे त्यांच्याच गोटातील मंत्र्याने ओकले. वाघाचे कातडे पांघरून हे लांडगे जनतेची फसवणूक करत आहेत. योग्य वेळी जनताच हे कातडे फाडून काढेल आणि त्यांना उघडे करेल. काय म्हणावे या सत्ता असुरांना तुम्हीच सांगा”
रवींद्र चव्हाण नेमकं काय म्हणाले?
रवींद्र चव्हाण यांनी’लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीनुसार, सुरतला गेल्यानंतर बंडखोर आमदारांचे फोन काढून घेण्यात आले होते. बंडखोर आमदारांची कार कोण चालवतंय, हेही संबंधित आमदारांना माहीत नव्हतं. आमदारांना टीव्हीही पाहू दिला नाही. गुवाहाटीला गेल्यानंतर आमदारांना टीव्ही बघण्याची परवानगी देण्यात आली. या ऑपरेशनमध्ये छोटी चूक झाली असती तरी हे ऑपरेशन सपशेल अपयशी ठरले असते. बंडखोरीच्या वाटाघाटींची कल्पना एकनाथ शिंदे यांच्या मुलाला देण्यात आली नव्हती. भाजपाच्या वरिष्ठ नेत्याने त्या पद्धतीने गोपनीयतेचा आदेश दिला होता.