पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ( ८ ऑगस्ट ) शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. भाजपाने नाही तर शिवसेनेनं युती तोडली, असा आरोप मोदींनी ठाकरेंवर केला होता. महाराष्ट्रातील ‘एनडीए’च्या खासदारांना मार्गदर्शन करताना मोदींनी हे विधान केलं होतं. यावर विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाष्य केलं आहे.
“ठाकरे कुटुंबीय सत्तेसाठी हापापलेले असते, तर मुख्यमंत्रीपदाची खुर्चीही हालू दिली नसती,” असं प्रत्युत्तर दानवे यांनी दिलं आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
अंबादास दानवे म्हणाले, “२०१४ साली दोन-तीन जागांसाठी वाद झाला. तेव्हा तत्कालीन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला आणि नंतर पत्रकार परिषद घेऊन युती तोडली. आताही ‘मातोश्री’वर दिलेल्या शब्दाला छेद कोणी दिला? हे महाराष्ट्राला माहिती आहे.”
“ठाकरे घराणे खोटे बोलते, असं सांगण्याची हिंमत कोणी करू शकणार नाही. कारण, ठाकरे कुटुंबीय शब्दांसाठी बाजी लावणारे आहे. ठाकरे कुटुंबीय सत्तेसाठी हापापलेले असते, तर मुख्यमंत्रीपदाची खुर्चीही हलू दिली नसती. भाजपाला ठाकरेंचं महत्व माहिती आहे. त्यामुळे ते ठाकरे नाव संपवण्याचा प्रयत्न करत आहेत,” असेही अंबादास दानवे यांनी म्हटलं.