सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल राखीव ठेवला आहे. कोणत्याही क्षणी न्यायालयाचा निकाल लागू शकतो. न्यायालयाचा निकाल कुणाच्या बाजुने लागणार? याबाबत अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मोठं विधान केलं आहे. कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल लागेल, असं विधान प्रकाश आंबेडकर यांनी केलं.
आंबेडकरांच्या या विधानावर विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काहीही लागला तरी महाराष्ट्रात राजकीय भूकंप तर होणारच आहे, असं विधान अंबादास दानवे यांनी केलं. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
हेही वाचा- पिक्चर अभी बाकी है? अजित पवारांच्या नाराजीवर गुलाबराव पाटलांचं सूचक विधान, म्हणाले…
“कर्नाटक निवडणुकीनंतर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेल, यानंतर महाराष्ट्रात राजकीय भूकंप होईल” या प्रकाश आंबेडकर यांच्या विधानाबाबत विचारलं असता अंबादास दानवे म्हणाले, “कर्नाटक निवडणुकीचा आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा काही संबंध असेल, असं मला वाटत नाही. सत्तासंघर्षावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. यावर आता लवकरात लवकर निकाल लागावा, अशी संपूर्ण महाराष्ट्राची अपेक्षा आहे. निकाल काहीही लागला तरी भूकंप तर होणारच आहे. कोणत्याही बाबी घडल्या तरी भूकंप होणार आहे. शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरणार आणि सध्याचं सरकार गडगडणार… अशाप्रकारे महाराष्ट्राचं जनमत आहे. कायदातही तेच नमूद केलं आहे. तेच व्हावं, अशी आमची अपेक्षा आहे.”
हेही वाचा- “आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला नाही”, प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान!
दरम्यान, अंबादास दानवे यांनी शरद पवार आणि अदाणी समूहाचे प्रमुख गौतम अदाणी यांच्या भेटीवरही भाष्य केलं आहे. “दोन व्यक्तींची भेट झाली म्हणून एखाद्या विषयाला खीळ बसू शकत नाही. सर्व विरोधी पक्षांनी जेपीसी चौकशीची मागणी केली आहे. सगळ्यांना मान्य असेल तर जीपीसीद्वारे चौकशी करायला काहीही हरकत नाही, अशी भूमिका शरद पवारांनीही यापूर्वी मांडली आहे. त्यामुळे गौतम अदाणी यांची भेट घेतली म्हणून शरद पवारांनी आपली भूमिका बदलली, असं म्हणायचं काहीही कारण नाही.”