भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री भागवत कराड यांनी छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आपण या मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढवली तर निवडून येऊ शकतो असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. यावर आता शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून प्रतिक्रिया आली आहे. ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे याबद्दल म्हणाले, मागच्या वेळी (२०२९ ची लोकसभा निवडणूक) भाजपाने युती असताना अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्या मागे पूर्ण ताकद उभी केली होती. असं असूनही जाधव यांची मतं आणि शिवसेनेची मतं यात खूप फरक होता.
अंबादास दानवे म्हणाले, “भागवत कराड हे व्यक्ती म्हणून चांगले आहेत. परंतु, ते छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचं नेतृत्व करू शकत नाहीत, असं माझं स्पष्ट मत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेची पाळंमुळं रुजली आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार रुजले आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत आमची थोडीशी चूक झाली असेल, परंतु, येणाऱ्या काळात अशी चूक न होता छत्रपती संभाजीनगरची लोकसभेची जागा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना (ठाकरे गट) जिंकेल.” आम्ही १०० टक्के ती जागा जिंकू असा दावा अंबादास दानवे यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना केला.
हे ही वाचा >> “त्या कंडक्टरला लोळंस्तोवर मारेन”, एसटी आगार प्रमुखांना आमदार संतोष बांगरांची धमकी; म्हणाले, “पायाखाली…”
अंबादास दानवे म्हणाले, भागवत कराड यांना छत्रपती संभाजीनगरची उमेदवारी मिळेल न मिळेल हा त्यांचा म्हणजेच भाजपाचा अंतर्गत प्रश्न आहे. आम्हाला त्याने काही फरक पडणार नाही. घोडं मैदान फार लांब नाही, वेळ आल्यावर आम्ही त्यांना दाखवून देऊ. छत्रपती संभाजीनगरचं मैदान जिंकण्यासाठी भाजपाकडून हाच घोडा आला तर आम्हाला काहीच अडचण नाही. भागवत कराड हे आमच्यासाठी चांगले उमेदवार आहेत.