जळगावातील पाचोऱ्यात आज उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच जळगावमधील राजकीय वातारवरण चांगलच तापलं आहे. शिंदे गट आणि ठाकरे गट, दोघांकडूनही एकमेकांना आव्हानं-प्रतिआव्हानं दिली जात असताना मनसेनेही उद्धव ठाकरेंच्या सभेला विरोधात करत सभास्थळी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तसेच काही मनसे कार्यकर्त्यांनी संजय राऊतांचा पुतळाही जाळण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, मनसेच्या इशाऱ्यावर आता शिवसेनेचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादस दानवे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
नेमकं काय म्हणाले अंबादास दानवे?
“शिवसेनेने आजपर्यंत कोणत्याही सभेला अडवलेलं नाही. मात्र तुम्ही जर शिवसेनेच्या सभेला आडवं जात असाल तर यापुढे तुमच्या सभा कशा होतात? हे आम्ही बघू”, असं प्रत्युत्तर अंबादास दानवे यांनी यांनी मनसेला दिलं आहे. तसेच “’ज्या गावच्या बाभळी त्या गावाच्या बोरी’ याप्रमाणे आम्हालाही या गोष्टीचं ज्ञान आहे. विचार ऐकायचे नसतील तर कान बंद करा. मात्र सभा होऊ देणार नसाल तर आगामी काळात तुमच्या सभेमध्ये शिवसैनिक काय करतील हे लक्षात ठेवा”, असेही ते म्हणाले.
“…म्हणून शिंदे गटाच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली”
पुढे बोलताना त्यांनी शिंदे गटालाही लक्ष्य केलं. पाचोऱ्यात विराट सभा होणार आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. “शिंदे गटाच्या नेत्यांनी दिलेल्या आव्हानांचा कोणताही परिणाम आजच्या सभेवर होणार नाही. याउलट अशी आव्हानं दिली तर शिवसैनिका त्वेषाने या सभेला येतील, यांची आव्हानं परतून लावणं ही आमच्यासाठी मोठी गोष्ट नाही”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
हेही वाचा – “…तर ते कुत्र्याला भुंकायला सांगू शकतात”, उद्धव ठाकरेंना आव्हान देत किरण पावसकरांची आव्हाडांवर टीका
गुलाबराव पाटलांना अंबादास दानवेंचं प्रत्युत्तर
दरम्यान, गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्या सभेत दगड मारू अशा आशायाचं एक विधान केलं होते. त्यावरही अंबादास दानवे यांनी भाष्य केलं. “गुलाबराव पाटलांचे हात आता दगड मारणारे नाही, तर खोके घेणाऱ्या गद्दाराचे हात झाले आहेत. ज्याचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत, त्यांनी आता दगड मारण्याची भाषा करू नये. खरं तर त्यांचे दगडांचे हात कधीच गद्दारी केल्यामुळे तुटून पडले आहेत”, अशी टीका त्यांनी केली.