राज्याचा पुढचा मुख्यमंत्री काँग्रेसचा असेल असं विधान माजी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी सांगलीत झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना केले होते. त्यांच्या विधानानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दरम्यान, या विधानावर आता ठाकरे गटाचे नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.
अंबादास दानवे यांनी आज टीव्ही ९ वृत्तावाहिनीशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यादरम्यान, त्यांना विश्वजीत कदम यांच्या विधानाबाबतही विचारण्यात आलं, यासंदर्भात बोलताना, आधी किमान जागावाटप तरी होऊ द्या, येणाऱ्या काळात काहीही होऊ शकतं, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
हेही वाचा – “देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला त्रास दिला अन् त्यांची…”; विशाल पाटील नेमकं काय म्हणाले?
नेमकं काय म्हणाले अंबादास दानवे?
“अद्याप निवडणूक जाहीर झालेली नाही. तसेच जागावाटपदेखील झालेलं नाही. खरं तर मुख्यमंत्री कोण होईल, हा निवडणुकीनंतरचा विषय आहे. मागच्या वेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होईल, असं कुणालाही वाटलं नव्हतं, पण ते मुख्यमंत्री झाले. त्यामुळे येणाऱ्या काळात काहीही होऊ शकतं”, असं अंबादास दानवे म्हणाले.
पुढे बोलताना त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून ( शरद पवार गट) जागावाटपाबाबत होत असलेल्या दाव्यांबाबतही प्रतिक्रिया दिली. “गेल्या निवडणुकीत राज्यात काँग्रेसची फक्त एक जागा आली होती. तो देखील शिवसेनेचा माजी आमदार होता. मुळात काँग्रेसचं केंद्रीय नेतृत्व परिपक्व आहे. नाना पटोले किंवा विश्वजीत कदम काय बोलतात, त्याला काँग्रेसमध्ये महत्त्व आहे, असं वाटत नाही. केंद्रीय नेतृत्वाला या सगळ्या परिस्थितीची जाणीव आहे, असे ते म्हणाले. तसेच येणाऱ्या काळात गद्दारांचं सरकार बदलणं जास्त महत्त्वाचे आहे”, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
विश्वजीत कदम नेमकं काय म्हणाले होते?
सांगलीतील कार्यक्रमात बोलताना विश्वजीत कदम यांनी राज्याचा पुढचा मुख्यमंत्री काँग्रेस असेल असं विधान केलं होतं. “लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांना सर्वाधिक मत्ताधिक्य मिरजेने दिले, ही निवडणुक सोपी नव्हती. ज्या पक्षात आम्ही काम करत होते त्याचे पक्षाचे तिकिट मिळत नव्हते, त्यामुळे अन्याय होत असल्याचे पाहून जनतेनेच या निवडणुकीत साथ दिली. जनतेने काँग्रेस पक्षाला आणि पक्षाच्या विचाराला साथ दिली. काँग्रेसचे विचार वाचविण्यासाठी जनतेने ही निवडणुक हातात घेतली होती”, असे ते म्हणाले. तसेच “आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात पाच आमदार काँग्रेसचे असतील आणि राज्याचा मुख्यमंत्री काँग्रेसचा असेल”, असे मत त्यांनी व्यक्त केलं होतं.