राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात बुधवारी (२१ जून) विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, मला मंचावरील मान्यवरांना सांगायचं आहे की, मला विरोधी पक्षनेतेपदात फार काही रस नव्हता. परंतु आमदारांनी आग्रह केल्यामुळे मी हे पद स्वीकारलं होतं. एक वर्ष झालं मी या पदावर काम करतोय. परंतु हे आता काही लोकांचं म्हणणं आहे की, मी कडक वागत नाही. आता मी काय त्यांची गचुरी धरू का काय करू? कडक वागत नाही म्हणजे नेमकं काय तेच कळत नाही. त्यामुळे आता बास झालं. मला आता विरोधी पक्षनेते पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा.

अजित पवार यांनी ही मागणी मांडली तेव्हा मंचावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह पक्षाचे नवनियुक्त कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थित होते. त्यामुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवारांच्या वक्तव्यावर कालपासून (२१ जून) वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचा महाविकास आघाडीतला मित्रपक्ष असलेल्या ठाकरे गटानेही यावर प्रतिक्रिया दिली आहे.

ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे याबाबत म्हणाले, अजित पवार यांनी पक्षात काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पक्ष संघटनेचं काम आणि विधीमंडळाचं काम यात निश्चितच फरक आहे. निश्चितच या दोन्हींची बंधणं आणि आवाका वेगवेगळा आहे. मी पक्ष संघटनेत काम करतोय आणि विधीमंडळाचंही काम करतोय. येत्या निवडणुकीच्या दृष्टीने बघायला गेलं तर संघटनेतील कामही महत्त्वाचं आहे.

हे ही वाचा >> “एकनाथ शिंदेंनी गोळी झाडून घेतली असती”, केसरकरांचा दावा संदीपान भुमरेंनी खोडला? म्हणाले, “मी सुरुवातीपासून…”

अजित पवारांच्या नाराजीची चर्चा सुरू असल्याचं बोललं जात आहे, त्यावर काय सांगाल? असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारल्यावर अंबादास दानवे म्हणाले, अजित पवार यांना पक्ष संघटनेत काम करावसं वाटत असेल तर त्याचा तेवढाच अर्थ घ्यावा. यातून नाराजीचा अर्थ काढण्याची काही गरज नाही. कारण पक्ष संघटनेचं कामही खूप महत्त्वाचं आहे.

Story img Loader