Ambadas Danve on Walmik Karad, Dhananjay Munde : बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याच्या आरोपाखाली, तसेच खंडणीसह इतर गुन्ह्यांमधील आरोपी वाल्मिक कराड याला पोलिसांनी अटक केली असून त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पोलीस अद्याप वाल्मिकविरोधात ठोस पुरावे गोळा करू शकले नसले तरी त्याला आता एक मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पथकाने कराडची संपूर्ण मालमत्ता जप्त करण्याच्या हालचाली सुरु केल्या आहेत. वाल्मिक कराडच्या मालकीच्या सर्व जंगम व स्थावर मालमत्तेची जप्ती करण्याची मागणी करणारा अर्ज विशेष तपास पथकाने (एसआयटी) दाखल केल्याची माहिती समोर आली आहे. मालमत्तेचा सर्व संभाव्य डेटा संकलित करण्यात आला असून त्यांचा रेकॉर्ड समोर येताच आणखी मालमत्ता जप्त केल्या जातील, असे सांगण्यात आलं आहे. दरम्यान, यावर वेगवेगळ्या राजकीय प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शिवसेनेचे (ठाकरे) नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एसआयटीच्या या प्रयत्नांचं कौतुक केलं आहे. दानवे नांदेडमध्ये प्रसारमाध्यमाशी बोलत होते.

अंबादास दानवे म्हणाले, “हा निर्णय चांगला आहे. परंतु, वाल्मिक कराडची स्वत:च्या नावावर किती आणि इतरांच्या नावावर संपत्ती किती आहे हे कोण शोधणार आहे? गुन्हा झाल्यानंतर कराड इतके दिवस फरार होता. त्या दिवसांत वेगवेगळ्या भागातील किती मालमत्ता ट्रान्सफर झाली? याचा तपास केला पाहिजे आणि यावर कारवाई झाली पाहिजे. यामध्ये सरकार पक्षपातीपणे वागत आहे असं मला वाटतं. आतापर्यंत दहा-वीस लाखांमध्ये कारवाई करणारी ईडी कोट्यवधीची संपत्ती असणाऱ्या मालकाला साधी नोटीस देत नाही, विचारणा करत नाही हे पाहून या तपासाविषयी निश्चित संभ्रम आहे. अजूनही या प्रकरणातील एक आरोपी फरार आहे. प्रसारमाध्यमं वेगवेगळ्या पद्धतीने या घटनेचे पुरावे म्हणून वेगवेगळे व्हिडीओ बाहेर आणत आहेत. पण पोलिसांना कळत नाही आहे. पोलिसांना हे शोधणं काही अवघड नाही. पण पोलीस हवा तसा तपास अजूनही करत नाहीत. तसेच वाल्मिक कराड व धनंजय मुंडे हे दोघेही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल दानवे काय म्हणाले?

दरम्यान, विरोधी पक्ष राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा वाल्मिक कराडचे निकटवर्तीय धनंजय मुंडेंवरही आरोप करत आहेत. विरोधी पक्षांमधील अनेक नेत्यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावरून वार्ताहरांनी अंबादास दानवेंसमोर प्रश्न उपस्थित केल्यानंतर दानवे म्हणाले, “धनंजय मुंडे व वाल्मिक कराड हे दोघे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, नैतिकदृष्ट्या मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा होता.

Story img Loader