विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन चालू असून आज (१ जुलै) विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या आमदारांमध्ये मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं. वरिष्ठ सभागृहात आमदारांनी शिवीगाळ करून सभागृहाला डाग लावण्याचा प्रयत्न केला. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली, तसेच शिवीगाळही केली. त्यानंतर प्रसाद लाड यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “दानवे यांनी माझ्याशी गैरव्यवहार करत मला आई-बहिणीवरुन शिवीगाळ केली. अंबादास दानवे यांनी सभागृहाची माफी मागावी.” त्याचबरोबर भाजपाने दानवे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.”

प्रसाद लाड म्हणाले, “राहुल गांधी यांनी लोकसभेत हिंदुत्वाबाबत जे वक्तव्य केलं त्यावर विधान परिषदेत बोलताना मी राहुल गांधींच्या निषेधाचा ठराव मांडला. तसेच तो ठराव लोकसभेत पाठवावा, अशी मागणी केली. त्यावर विरोधी पक्षनेत्यांनी उत्तर द्यावं, अशी मागणीही मी केली. त्यानंतर दानवे उत्तर देण्यासाठी उभे राहिले आणि त्यांनी मला आई बहिणीवरुन शिवीगाळ केली,”

दरम्यान, सभागृहात जे काही घडलं त्यावर आणि प्रसाद लाड यांच्या आरोपांवर अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दानवे यांनी विधीमंडळ परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, माझा काही तोल सुटलेला नाही. मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा कट्टर शिवसैनिक आहे. त्यामुळे माझ्यावर कोणी बोट उचललं तर ते बोट तोडायची ताकद माझ्या मनगटात आहे. सभागृहात माझा तोल सुटला नाही. मुळात जो विषय या सभागृहाशी संबंधित नव्हता त्यावर ते (प्रसाद लाड) माझ्याकडे बोट दाखवून, हातवारे करून बोलत होते. त्यांना काही बोलायचं होतं तर त्यांनी थेट सभापतींशी बोलायला हवं होतं. माझ्याकडे बोट दाखवून बोलण्याला काही अर्थ नव्हता. एखाद्या सदस्याला बोलण्यापासून रोखण्याचा कोणालाही अधिकार नाही. राहिला प्रश्न आक्रमकतेचा, तर मी आमदार असणं, विरोधी पक्ष नेता असणं ही वेगळी गोष्ट, पण त्याआधी मी एक शिवसैनिक आहे आणि ती एका शिवसैनिकाची प्रतिक्रिया होती.

हे ही वाचा >> राहुल गांधींच्या घणाघाती भाषणादरम्यान पंतप्रधान मोदींची एका वाक्यात प्रतिक्रिया, विरोधकांकडून ‘वाह, वाह’ म्हणत चिमटा

अंबादास दानवे म्हणाले, “जे लोक राष्ट्रवादी किंवा इतर कुठल्या पक्षातून नुकतेच भाजपात आले आहेत, ज्यांनी आधी वेगवेगळे विचार आत्मसात केले होते, ज्यांना भाजपात येऊन ज्यांना जुम्मा जुम्मा चारच दिवस झाले आहेत, ते लोक मला हिंदुत्व शिकवणार का? माझ्यावर ७५ खटले चालू आहेत. दंगलीसह सर्व प्रकारच्या खटल्यांमध्ये माझं नाव आहे. मी चार वेळा तडीपार देखील झालो आहे. अशा शिवसैनिकाला प्रसाद लाडसारख्या माणसाने हिंदुत्व शिकण्याची गरज नाही. प्रसाद लाडसारखा **** माणूस मला हिंदुत्व शिकवणार का? पक्षाचा विचार घेऊन नुसता **** करणारा माणूस मला हिंदुत्व शिकवणार का?”