शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि खासदार गजानन कीर्तिकर यांच्या राजकीय वाटचालीवर आधारित एक पुस्तक नुकतंच प्रकाशित करण्यात आलं आहे. या पुस्तकातून कीर्तिकर यांनी वेगवेगळे राजकीय गौप्यस्फोट केले आहेत. त्यावर राजकीय प्रतिक्रियादेखील येऊ लागल्या आहेत. या पुस्तकात कीर्तिकर यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मातोश्रीवर (शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान) काय चर्चा झाली, तसेच २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मातोश्रीवर काय घडामोडी घडल्या यावर सविस्तर मुद्दे मांडले आहेत. ‘शिवसेना, लोकाधिकार आणि मी’ असं या पुस्तकाचं नाव असून दोन दिवसांपूर्वी मुंबईत या पुस्तकाचा प्रकाशनसोहळा पार पडला.
या पुस्तकात गजानन कीर्तिकर यांनी दावा केला आहे की उद्धव ठाकरे नेहमी म्हणत असतात की “सर्वसामान्य शिवसैनिकाला मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करेन. मी तसा दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शब्द दिला आहे”. ते असं बोलत असले, तरी २०१९ मध्ये शिवसेनाचा सर्वांना अपेक्षित असलेला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असलेले एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांनी डावललं आणि मुख्यमंत्रीपद दिलं नाही. उलट ते स्वतः त्या खुर्चीवर बसले. २०१४ च्या वेळी तर राज्याचं उपमुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना द्यावं लागेल म्हणून शिवसेनेनं ते पद स्वीकारलंच नाही.
हे ही वाचा >> “पप्पांनी नऊ दिवस काहीच खाल्लं नाही, त्यांची…”, जरांगे पाटलांच्या मुलाचे डोळे पाणावले…
गजानन कीर्तिकर यांच्या पुस्तकातील दाव्यांवर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. २०१४ च्या उपमुख्यमंत्रीपदाबद्दलच्या दाव्यावर अंबादास दानवे म्हणाले, “तो दावा चुकीचा आहे. तसं असतं तर त्यावेळी एकनाथ शिंदे यांना नगरविकास खातं दिलंच नसतं”. तर २०१९ च्या मुख्यमंत्रीपदाबद्दलच्या दाव्यावर अंबादास दानवे म्हणाले, “उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांचंच नाव घेतलं होतं. परंतु, बाकीच्या पक्षाच्या लोकांनी (काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस), अजित पवार यांच्यासह इतरांनी एकनाथ शिंदेंच्या नावाला विरोध केला होता.”