Ambadas Danve मुंबई पोलीस हे बेटिंगला सहकार्य करत आहेत. त्याचे पुरावे पेन ड्राईव्हमध्ये आहेत असं म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक पेन ड्राइव्ह अध्यक्षांना दिला आहे. तसंच मुंबई पोलिसांच्या उपस्थितीत पाकिस्तानी खेळाडूंशी संपर्क केला जातो आहे. बेटिंगमध्ये अनेक पोलीस अधिकारी आहेत असा गंभीर आरोप दानवे यांनी केला आहे.

अंबादास दानवेंचा आरोप काय?

माझ्याकडे अनेक फसवणुकीच्या घटना आहेत, खालच्या सभागृहात बेटिंग अॅपबाबतही बोलणं झालं आहे. मी एक पेन ड्राइव्ह आपल्याला देत आहे. क्रिकेट बेटिंग अॅप आहे लोटस २४ नावाचं. यामध्ये मेहुल जैन, हिरेश जैन, कमलेश जैन हे लोक सातत्याने बेटिंग करतात. पाकिस्तानातील खेळाडूंशी हे संपर्क ठेवून आहेत. खुलेआमपणे बेटिंग चालतं. मुंबई पोलिसांमधल्या मोठ्या अधिकाऱ्यांसह बैठक होते. चॅम्पियन्स ट्रॉफी संपली आता आयपीएलसाठी मुंबईत ही मंडळी काम करत आहेत. पेन ड्राइव्ह ऐका म्हणजे पाकिस्तानातल्या लोकांशी बोलताना काय केलं आहे ते कळेल. कुठल्या पोलीस अधिकाऱ्यांची नावं आहेत ते पण कळेल. अशा पद्धतीने पोलिसांच्या सहकार्याने राज्यात बेटिंगसारख्या घटना घडत आहेत. असा गंभीर आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे.

पोलीस अधिकारी सत्ताधाऱ्यांची हुजरेगिरी करण्यात गुंतले आहेत-अंबादास दानवे

राज्यातील कायदा आणि सु्व्यवस्थेचा प्रश्न पाहिला तर पोलीस अधिकारी सत्ताधाऱ्यांची हुजरेगिरी करण्यात गुंतले आहेत असंही अंबादास दानवेंनी म्हटलं आहे. माझ्याकडे अनेक उदाहरणं आहेत. एका मंत्र्याच्या सांगण्यावरुन महिलेला कसं फसवलं जातं? महिलेने लाच स्वीकारली असेल पण मंत्र्यावर गुन्हा आहेच. पत्रकाराला अटक झाली पण मंत्र्यावर गुन्हा आहेच. पोलिसांचा वापर केला जातो आहे. पोलीस यंत्रणा व्यक्तिगत कामांसाठी मंत्री वापरत आहेत. राज्यातल्या विविध खात्यांमधले, मंत्र्यांचे गैरव्यवहार समोर येत आहेत. कसे गैरव्यवहार होतात ते समोर आलं आहे असंही अंबादास दानवेंनी म्हटलं आहे.

अहिल्यानगर या ठिकाणी काय घडलं?

महसूल विभागाची काही प्रकरणं आहेत. राज्य सरकारमधले मंत्री, आमदार कसे वागतात त्याचं उदाहरण देतो. अहिल्यानगर या ठिकाणी बऱ्हाणपूर नावाचं गाव आहे तिथे तुळजाभवानीचं मंदिर आहे, तिथे एक भगत नावाचे पुजारी आहेत. तसंच या ठिकाणी एक प्रवेशद्वार आहे याबाबत अनेकजण असं म्हणतात की अनेक पोथ्या, अख्यायनं यामध्ये त्याचा उल्लेख आहे. निवडणूक काळात या भागातले अभिषेक भगत हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या विचारांचे आहेत. त्यांनी त्या पक्षाचा प्रचार केला म्हणून कर्डिले नावाचे आमदार आहेत. त्यांनी हे प्रवेशद्वार आणि अंबिका भवन पाडलं, त्यासाठी महसूल विभागाला हाताशी धरलं होतं. हिंदुत्ववाद म्हणत असताना याकडे लक्ष द्यायची गरज आहे. कलेक्टरला फोन केला असता अनधिकृत बांधकामं अनेक आहेत असंही कळलं. जे विरोधात आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाते असा प्रकार घडला आहे.