Ambadas Danve vs Amol Kolhe Conflicts in Mahavikas Aghadi : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने महाविकास आघाडीची एकजूट व ताकद पाहिली. मात्र महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचं पानिपत झालं. त्यानंतर आता मविआमध्ये धुसफूस चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. मविआमधील सर्वच पक्ष व त्यांचे नेते आता एकमेकांवर टीका करत आहेत. तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत स्वबळाचा नारा देत आहेत. “लोकसभेनंतर आम्ही मुख्यमंत्रिपदासाठी वाद घातले, एकमेकांवर कुरघोड्या केल्या”, असं म्हणत काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी मविआला घरचा आहेर दिला आहे. तर, शिवसेनेचे (ठाकरे) राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही स्वबळावर लढू शकतो असं म्हटलं आहे. त्यानंतर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी मविआतील मित्रपक्षांना टोला लगावला.
अमोल कोल्हे म्हणाले, “विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे काँग्रेसची मोडलेली पाठ अद्याप सरळ व्हायला तयार नाही, तर, दुसऱ्या बाजूला शिवसेना (ठाकरे) अजूनही झोपेतून जागी झालेली नाही. राज्यात मित्र पक्षांच्या अशा वागण्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या आपल्या पक्षाला विरोधी पक्ष म्हणून वाढण्यासाठी मोठी जागा व संधी आहे. खरंतर, पराभव हा आधी मनात होतो आणि त्यानंतर रणांगणात होतो, त्यामुळे मरगळ झटका आणि कामाला लागा. तुमच्याकडे लढणारे शरद पवार आहेत”. कोल्हे यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस नेत्यांनी व शिवसेनेच्या (ठाकरे) नेत्यांनी त्यांच्यावर पलटवार केला आहे.
हे ही वाचा >> सरपंचाच्या मृत्यूमुळं बीड पुन्हा हादरलं; राखेची वाहतूक करणाऱ्या वाहनानं चिरडलं, आमदार सुरेश धसांनी व्यक्त केला संशय
“अमोल कोल्हे हवेवर निवडून येणारे खासदार”, दानवेंचा पलटवार
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, “अमोल कोल्हे हे हवेवर निवडून येणारे खासदार आहेत. संघटनेत २०-३० वर्षे झिजावं लागतं ते त्यांना माहित नाही. मविआबद्दल त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं आहे. एखादा परभव आणि विजय या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आघाडीत बिघाडी कुठेही नाही. निवडणूक आली की विजय पराजय होतो. माविआ फुटणार नाही.
हे ही वाचा >> “बळं बळं चौकशी…”, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर अजित पवारांचा संताप; म्हणाले, “या प्रकरणात…”
शिवसेना (ठाकरे) निवडणूक स्वबळावर लढण्याबाबत ठाम
तत्पूर्वी, शिवसेना (ठाकरे) खासदार अरविंद सावंत यांनी देखील कोल्हेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली होती. सावंत म्हणाले, “काँग्रेसने आम्हाला विदर्भात एकही जागा दिली नाही. आम्ही जागा मागत राहिलो तरीदेखील त्यांनी आम्हाला जागा दिली नाही. मला असं वाटतं की भविष्त प्रत्येक पक्ष जर महाविकास आघाडीमधूनच लढत राहिला तर तळागाळातील कार्यकर्त्यांवर अन्याय होईल आणि ते तयार होणार नाहीत. त्यामुळे भविष्या प्रत्येक पक्ष हा स्वबळावर लढेल असं चित्र सध्या तरी दिसतंय”, असं मोठं वक्तव्य अरविंद सावंत यांनी केलं.