शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची २ एप्रिलला संभाजीनगर येथे सभा होणार आहे. या सभेच्या तयासाठी ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष कामाला लागले आहेत. या सभेच्या आयोजनासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे स्थानिक नेते या सभेची तयारी करत आहेत. दरम्यान, यावेळी माध्यमांनी दानवे आणि खैरे यांच्याशी बातचित केली.
अंबादास दानवे टीव्ही ९ मराठीशी बोलताना म्हणाले की, “शिवसेनेची संभाजीनगरात मोठी ताकद आहेच. त्यासोबत २ तारखेला होणाऱ्या सभेद्वारे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस मिळून महाविकास आघाडीची ताकद दिसेल. ही सभा खूप मोठी होणार आहे. उद्धव ठाकरेंच्या खेड येथील सभेला उत्तर म्हणून एकनाथ शिंदे यांनीदेखील सभा घेतली. त्याबद्दल विचारले असता अंबादास दानवे म्हणाले की, गद्दारांकडे उत्तर देण्याची मानसिक ताकद नाही. त्यांच्या सभांमध्ये केवळ मिळमिळितपणा असतो आणि खोट्या घोषणा असतात.”
हे ही वाचा >> “…की घरी बसून अंडी उबवणार?” सावरकरांच्या अपमानावरून राहुल गांधींना इशारा देणाऱ्या उद्धव ठाकरेंना मनसेचा टोला
“शिंदेंच्या सभेला माणसं धरून आणली जातात”
दानवे म्हणाले की, एकनाथ शिंदेंच्या सभेला माणसं धरून आणली जातात. ही माणसं भाषण सुरू झाल्यावर उठून जातात. तर शिवसेनेच्या सभेला आलेली माणसं राष्ट्रगीत होईपर्यंत तशीच बसलेली असतात. तर चंद्रकांत खैरे म्हणाले की, महाविकास आघाडीच्या सभेच्या कामाला आम्ही सुरुवात केली आहे. ही सभा खूप यशस्वी होईल. सभेला हे मैदान पुरेल की नाही अशी शंका मला येत आहे. कालच्या मालेगावच्या सभेला मैदान पुरलं नव्हतं लोक मेदानाबाहेरही उभे होते. तशीच गर्दी इथेदेखील होईल.