छत्रपती संभाजीनगरमध्ये आज (रविवार) महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’सभा पार पडत आहे. महाविकास आघाडीचे प्रमुख नेते या सभेला उपस्थित आहेत. या सभेतून ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी थेट पोलिसांना दम दिला आहे. सत्ताधाऱ्यांच्या नादी लागून जास्त मस्ती करू नका. जर पोलिसांना मस्ती आली असेल तर जिरवून दाखव, असा धमकीवजा इशारा अंबादास दानवे यांनी दिला.
खरं तर, छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची सभा होत आहे. या सभेला राज्यभरातून कार्यकर्ते येत आहेत. पण शहरातील विविध ठिकाणी या कार्यकर्त्यांच्या गाड्या पोलिसांकडून आडवल्या जात आहेत. तसेच त्यांना दुसऱ्या मार्गाने जाण्यास सांगितलं जात आहे, असा दावा अंबादास दानवे यांनी केला. याच प्रकारावरून अंबादास दानवे यांनी थेट पोलिसांना दम दिला.
सत्ताधाऱ्यांच्या नादी लागून जास्त मस्ती करू नका – अंबादास दानवे
यावेळी अंबादास दानवे म्हणाले, “मी पोलिसांना विनंती करतो की, सभेला येणाऱ्यांसाठी जुबली पार्कजवळ येऊ द्यायचं, हे आपलं ठरलं आहे. पण बाबा पेट्रोल पंपाजवळ किमान ८०० गाड्या आता उभ्या आहेत. आजचा दिवस तुमचा आहे, उद्याचा दिवस आमचा राहील, हे मी तुम्हाला सांगून ठेवतो. पोलिसांनी सत्ताधाऱ्यांच्या नादी लागून जास्त मस्ती करू नये, ही माझी नम्र विनंती आहे.”
हेही वाचा- “…तर आमदारकी कधी जाईल सांगता येत नाही”, संभाजीनगरमध्ये धनंजय मुंडेंचं विधान
“आपलं बैठकीत ठरलं होतं. पण केम्ब्रिज शाळेजवळही गाड्या थांबवल्या आहेत. त्या गाड्या जालना रोडवरून सभास्थळी येऊ द्यायचं, हे ठरलं होतं. पण तुम्ही या वाहनांना झालटा फाट्यावरून पाठवत आहात. जर पोलिसांना मस्ती आली असेल, तर जिरवून दाखवू, हेही मी तुम्हाला सांगून ठेवतो. गाड्या थांबवू नका, ही माझी पोलिसांना नम्र विनंती आहे,” अशा शब्दांत अंबादास दानवे यांनी इशारा दिला आहे.