मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकतंच अयोध्या दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर शिंदे गटाचे आमदार, खासदार, नेते, पदाधिकारी आणि अनेक कार्यकर्तेही होते. मुख्यमंत्री शिंदे यांनी काल अयोध्यानगरीत जाऊन प्रभू रामाची आरती केली आहे. त्यानं ते पुन्हा महाराष्ट्रात परतले आहेत. मात्र, आता एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.
एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्यात खंडणी, खुनाचा प्रयत्न, अमली पदार्थांची तस्करी अशा विविध गुन्ह्यांत आरोपी असलेला ठाण्यातील गुंडही गेल्याचं समोर आलं आहे. ट्विटरवरील शुभम जटाल नावाच्या तरुणाने ठाण्यातील कुख्यात गुंड सिद्धू उर्फ सिद्धेश अभंगे याचा एक फोटो ट्वीट केला आहे. ठाण्यातील गुंड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लोकांबरोबर काय करत आहे? तोही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर अयोध्या दौऱ्याला गेला होता काय? असा सवाल शुभम जटाल नावाच्या तरुणाने विचारला.
हेही वाचा- “काहींना माईक हातात आल्यावर…”, ‘त्या’ विधानांवरून अजित पवारांचा उद्धव ठाकरेंसह फडणवीसांवर निशाणा
यानंतर ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल विचारले आहेत. “हा काय’फडतूस’पणा आहे? अगोदर गुजरातमध्ये वॉशिंग मशीन लावून गद्दार धुतले. आता पवित्र अशा अयोध्येत मशीन लावून खून, खंडणी प्रकरणातील आरोपी सिद्धेश अभंगे याला धुवायला नेलं होतं वाटतं. तेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विमानातून. देवेंद्र फडणवीसजी तुम्हाला हे चालते का?” असा सवाल अंबादास दानवे यांनी विचारला.