महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा पेच आणखी लांबणीवर पडला आहे. कारण, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी १४ फेब्रुवारीला होईल अशी माहिती सरन्यायाधीश डी. वाय चंद्रचूड यांनी दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली.
पत्रकारपरिषदेत अंबादास दानवे म्हणाले, “अनिल कपूरचा मेरी जंग.. हा जो सिनेमा होता, त्यामध्ये त्याने जो डायलॉग म्हटला आहे. “तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख….जज साहब तारीख तो मिल रही है, लेकीन इन्साफ नही मिल रहा है.” मला वाटतं तशीच काहीशी स्थिती या तारखेच्या निमित्त निर्माण झालेली आहे.”
याचबरोबर “ठीक आहे, काही हरकत नाही १४ तारीख जरी आली. त्या दिवशी का असेना कारण, सगळी परिस्थिती समोर आहे. पक्षांतर बंदीचा कायदा काय आहे?, पक्षादेश काय आहे? या सगळ्या गोष्टी स्पष्ट असताना मला असं वाटतं आता तरी या तारखेला न्यायालयाने निर्णय घ्यावा, असं अपेक्षित आहे.” असंही दानवे यांनी यावेळी म्हटलं.
महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यापासून आणि एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेवर दावा सांगितल्यापासून हा ठाकरे विरूद्ध शिंदे हा संघर्ष सुप्रीम कोर्टात पोहचला आहे. याआधीही अनेकदा तारीख पे तारीखचा अनुभव आला होता. त्यानंतर आज काहीतरी ठोस निर्णय दिला जाईल असं वाटलं होतं. मात्र आता सुप्रीम कोर्टाने हे स्पष्ट केलं आहे की या सत्तासंघर्षाची सुनावणी १४ फेब्रुवारीपासून सलग घेतली जाईल.