वाई: शरद पवार आणि अजित पवार या दोन्ही नेत्यांमध्ये निवड करणे अवघड असल्याने त्यांचा सन्मान ठेवूनच यापुढे वाटचाल करणार असल्याचे सांगत आमदार शशिकांत शिंदे यांनी पक्ष फुटीनंतरची आपली संदिग्धता कायम ठेवली आहे.कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील विधान परिषदेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. यावेळी ते बोलत होते. बैठकीला शिवाजीराव महाडिक संजय झंवर, रमेश उबाळे आदी कोरेगाव खटाव सातारा तालुक्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर राज्यातील बहुसंख्य आमदार, पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. अनेकांनी आपली भूमिका पुन्हा पुन्हा बदलल्याचेही दिसत आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे हे कुठल्या गटाकडे याबाबत अद्याप जाहीर झालेले नाही. त्यांचा समावेश शरद पवार यांच्या गटात केला जात असला तरी त्यांनी तसे जाहीर केले नाही. या पार्श्वभूमीवर त्यांनी आयोजित केलेल्या कार्यकत्यांच्या मेळाव्यात शिंदे यांनी दोन्ही गटांना समान अंतरावर ठेवत आपली संदिग्धता कायम ठेवली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सातारा जिल्ह्यात कार्यकर्त्यांमध्ये शरद पवार की अजित पवार अशी संभ्रमावस्था निर्माण झाली आहे असे सांगून शशिकांत शिंदे म्हणाले, शरद पवार की अजित पवार अशी एक निवड करणे अवघड आहे. कुणाचीही बाजू घेतली तरी अनेक कार्यकर्ते नाराज होणार आहेत. साताऱ्यात काही नेत्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वाला पाठिंबा दिला, तर बहुसंख्य जण पक्ष सोडून अजितदादांकडे गेले आहेत. या सर्व घडामोडी पाहता आपल्यालाही आपली भूमिका घेणे गरजेचे आहे. पण ते आज अवघड आहे असे सांगत शशिकांत शिंदे यांनी आपली संदिग्धता कायम ठेवली आहे.

Story img Loader