मुरूड या पर्यटनस्थळी पर्यटकांची होणारी वाढ तसेच वाढत्या नागरीकरणामुळे पायाभूत सुविधांची आवश्यकता लक्षात घेऊन अंबोली धरणाचा धाडसी प्रकल्प नाबार्डच्या अर्थसहाय्याने आकारास आला आहे. जलशुद्धीकरण प्रकल्प येत्या ३१ मेपूर्वी पूर्ण करून भव्य लोकार्पण सोहळा आयोजित केला जाईल, अशी ग्वाही राज्याचे जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांनी दिली. मुरूड येथे जिल्हा वार्षिक योजनांतर्गत विविध कामांचा भूमिपूजन समारंभ व खार अंबोली मुरूड पाणीपुरवठा योजनेची पाहणी कार्यक्रमात तटकरे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा उपाध्यक्ष मंगेश दांडेकर, प्रदेश सरचिटणीस स्मिता खेडेकर, अतिक खतिब, नगराध्यक्षा कल्पना पाटील, भरत बेलोसे, उपनगराध्यक्ष अ. रहीम कबले, नगरसेवक संदीप पाटील, संजय गुंजाळ, मेघाली पाटील आदी उपस्थित होते. आपल्या भाषणात तटकरे यांनी २००९ पासून मुरूड तालुक्यासाठी केलेल्या विकास कामांचा आढावा घेत ‘क’ वर्ग नगरपरिषदेला पर्यायाने स्थानिक जनतेला भरुदड नको म्हणून पाणीपुरवठा योजनेतील १ कोटी १० लाखांची लोकवर्गणीची माफी दिल्याचे सांगितले. जिल्हा नियोजन मंडळातून मुरूड तालुक्यासाठी २.७५ कोटींची मंजुरी मिळाल्याचे स्पष्ट केले. मुरूड तालुक्यात विहूर येथे भव्य क्रीडा संकुलासाठी १ कोटी मंजूर झाल्याचे घोषित केले. विकासाचे पर्व आता कुणीही थांबवू शकणार नाही. माझा मतदार संघ श्रीवर्धन असला तरी मुरूडच्या र्सवकष विकास करणे हे आपले ध्येय असल्याचा पुनर्उच्चार केला. दौऱ्या दरम्यान प्रियदर्शनी सोसायटी येथे रस्ता काँक्रीटीकरण, पेठ मोहल्ला लक्ष्मीखार स्मशानभूमी तसेच पेठ मोहल्ला कब्रस्तान व सुशोभीकरण, इदगाह संरक्षक भिंत, जकातनाका, लक्ष्मीखार कंपाऊंड कामाचे भूमिपूजनदेखील त्यांच्या हस्ते करण्यात आले. नगराध्यक्षा कल्पना पाटील यांनी लेडी कुलसुम बेग हॉस्पिटल नव्याने सुरू करण्याची जुनीच मागणी प्रास्ताविकात विशद केली. नीतिन पवार यांनी आभार व्यक्त केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा