सोलापूर : चीनचे वाढते व्यापारी वर्चस्व रोखण्यासाठी अमेरिकेला भारताची मोठी गरज आहे. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे भारताशी दृढ संबंध कायम करतील, असा विश्वास डॉ. अनंत लाभसेटवार यांनी व्यक्त केला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, डॉ. अनंत ॲण्ड लता लाभसेटवार चॅरिटेबल ट्रस्ट (नागपूर) आणि लाभसेटवार फाउंडेशन (अमेरिका) यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठात डॉ. लाभसेटवार यांचे व्याख्यान झाले. त्या वेळी ते बोलत होते.
‘डोनाल्ड ट्रम्प आणि भारत-अमेरिकेचे परराष्ट्र धोरण’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा अध्यक्षस्थानी होते. या वेळी लता लाभसेटवार, विद्यापीठाच्या कुलसचिव योगिनी घारे आदींची उपस्थिती होती. सामाजिक शास्त्रे संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. लाभसेटवार म्हणाले, की अमेरिकेत अनधिकृतपणे प्रवेश करून राहणाऱ्या नागरिकांमुळे तेथील मूलभूत सुविधांवर जास्त भर वाढत असल्यामुळे अशा अवैधपणे राहणाऱ्या नागरिकांना ज्यांच्या-त्यांच्या देशात परत पाठवण्याची सुरुवात ट्रम्प यांनी केली आहे. त्याचाच भाग म्हणून अमेरिकेत बेकायदारीत्या राहणाऱ्या भारतीय नागरिकांनाही भारतात परत पाठवण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. परंतु अमेरिकेने भारतात परत पाठवताना संबंधित नागरिकांना लष्करी विमानातून आणि हातात बेड्या घालून अवमानकारक वागणूक दिल्याच्या घटनेचा डॉ. लाभसेटवार यांनी उल्लेख टाळला.