राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्यातला वाद मिटण्याचं नाव घेत नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त १४ जून रोजी राज ठाकरे यांना शुभेच्छा देणारे बॅनर मनसैनिकांनी लावले होते. यावर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातले मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला होता. त्यावरून जितेंद्र आव्हाडांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे अमेय खोपकर यांनी जितेंद्र आव्हडांना प्रत्युत्तर देणारं ट्वीट केलं. या ट्वीटवर पुन्हा आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिलं. आता आव्हाडांच्या ट्वीटनंतर अमेय खोपकर यांनी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी बोलताना आव्हाडांना थिल्लरपणा बंद करा असा कडक इशारा दिला आहे.
राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त लावलेले बॅनर पाहून जितेंद्र आव्हाडांनी “सध्या त्यांच्या पक्षाचा एकच आमदार आहे. हा आकडा ५० पर्यंत न्यावा लागेल. फक्त कुणाचीतरी नक्कल करून मुख्यमंत्री होता येत नाही”, असा चिमटा काढला होता. त्यावरून मनसेच्या नेते खोपकर यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली. “जितुद्दीन आव्हाड यांचा चेहरा नागाच्या फण्यासारखा आहे. हे कोण बोललं होतं ते सगळ्यांनाच आठवत असेल. आता नागच तो, फणा काढतच फिरणार. पण कितीही फुत्कार निघाले, तरी आम्ही मनसैनिक बिनकामाच्या नागाला अजिबातच महत्त्व देत नाही”, असं ट्वीट करत अमेय खोपकरांनी जितेंद्र आव्हाडांना डिवचलं.
अमेय खोपकरांच्या या ट्वीटवर जितेंद्र आव्हाडांनी पुन्हा खोचक ट्वीट करत थेट राज ठाकरेंना लक्ष्य केलं आहे. “माझा चेहरा नागाच्या फण्यासारखा आहे हे कोण बोललं होतं ते सगळ्यांना आठवत असेलच. पण त्याला मी दिलेलं उत्तरही लोकांना आठवतं आणि लोक गदगदून हसतात. माझा चेहरा नागाच्या फण्यासारखा आहे, मग तुमचा चेहरा कोंबडीच्या कोणत्या भागासारखा आहे सांगू का? बघा आरश्यात. जशास तसे उत्तर कुणालाही देता येतं. अमेय खोपकर, लवकर बरा हो”, असं प्रत्युत्तर जितेंद्र आव्हाडांनी दिलं.
आता आव्हाडांच्या या ट्वीटवर अमेय खोपकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसेच आव्हाडांना इशारा दिला आहे. अमेय खोपकर म्हणाले, खरंतर सध्याचं जे राजकारण सुरू आहे, त्यात चिखल झाला आहे. अशा परिस्थितीत जनतेच्या मनात राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांसारखे आहेत. जनता ते मुख्यमंत्री व्हावेत याकडे डोळे लावून बसली आहे, तसेच कार्यकर्त्यांचं प्रेम असतं, वाढदिवसाचा उत्साह असतो. त्याच्यात कुठेतरी मिठाचा खडा टाकायचा प्रयत्न आव्हाडांसारखे लोक करतात. हल्ली राजकारणात आव्हाडांसारखी विघ्नसंतोषी माणसं खूप झाली आहेत. ही स्वार्थी माणसं आहेत. ही महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली कीड आहे.
हे ही वाचा >> “उद्धव ठाकरेंसाठी भाजपाची दारं खुलीच, त्यांनी…”, उपमुख्यमंत्र्यांची युतीसाठी ऑफर
खोपकर म्हणाले, कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण असताना तुम्हाला मनसैनिकांच्या खोड्या करायची काय गरज आहे. वातावरण बिघडवण्याची काय गरज आहे? कोण काय करतंय, कोण कोणावर काय टीका करतंय? याच्याशी तुमचं काय देणंघेणं? जितेंद्र आव्हाडांची राज ठाकरेंविषयी बोलण्याची पात्रता नाही. उद्या जर आमचा संयम सुटला तर तुमचं इकडे तिकडे पळणं मुश्किल होईल. महाराष्ट्र सैनिक तुमच्या लोकांचं फिरणं मुश्किल करून ठेवतील. महाराष्ट्र सैनिक शांत आहे तोवर शांत आहे. उगाच आमची माथी भडकवू नका. आम्हाला चिथवू नका. आव्हाडांनी हा थिल्लरपणा बंद करावा, हा थिल्लर नाच बंद करा, अन्यथा महाराष्ट्र सैनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागेल, ही चेतावणी समजा.