Amit Deshmukh On Congress State President Nana Patole : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मोठं बहुमत मिळालं. मात्र, महाविकास आघाडीला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. यामध्ये लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत काँग्रेसलाही विधानसभेच्या निवडणुकीत मोठं अपयश आलं. विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात आहे. मात्र, विधानसभेतील पराभवानंतर खरंच काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाचा सूर आहे का? या प्रश्नावर काँग्रेस नेते तथा माजी मंत्री अमित देशमुख यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच अशी कोणतीही चर्चा नसल्याचं सांगत महाराष्ट्रातील काँग्रेस नेतृत्वात बदल होणार नसल्याचंही अमित देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमित देशमुख काय म्हणाले?

विधानसभेत आलेल्या अपयशानंतर आता काँग्रेसची पुढची वाटचाल कशी असेल? यावर बोलताना अमित देशमुख म्हणाले की,”असं आहे की एकदा पराभव झाल्यानंतर तो स्वीकारून पुन्हा कामाला लागावं लागतं. आता काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा कामाला लागला आहे. आमची वैचारीक लढाई सुरु आहे आणि सुरु राहणार आहे. काँग्रेसचा विचार आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत”, अमित देशमुखांनी म्हटलं.

हेही वाचा : “गरीब शेतकऱ्यांच्या जमिनी घशात घालून…”, वक्फ दुरुस्ती विधेयकासाठी राज ठाकरे मैदानात; केंद्र व राज्य सरकारकडे मोठी मागणी

विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद मिळणार का?

महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर आता विरोधकांकडे संख्याबळ कमी असल्यामुळे विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद मिळणार की नाही? याबाबत अद्याप संभ्रम आहे. यासंदर्भात बोलताना अमित देशमुख यांनी म्हटलं की, “आम्ही विधानसभेच्या अध्यक्षांकडे विरोधीपक्ष नेत्याबाबतची मागणी केलेली आहे. महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद त्यांनी दिलं पाहिजे. त्याचा विचार ते करत असतील”, असंही त्यांनी म्हटलं.

काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा

विधानसभेतील अपयशानंतर आता काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा आहे? पक्षात देखील खरंच प्रदेशाध्यक्ष बदलाचा सूर आहे का? असा प्रश्न विचारला असता अमित देशमुख म्हणाले, “अशी कुठलीही चर्चा सुरु नाही. नाना पटोले हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. लोकसभेच्या निवडणुकीत देखील नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष असतानाच काँग्रेसला मोठं यश मिळालं. त्यामुळे ते यश विसरून चालणार नाही. आता विधानसभेच्या निवडणुकीत म्हणावा तसा कौल आला नाही म्हणून टीका करणं हे अन्यायकारक आहे. मला असं वाटतं की प्रदेशाध्यक्ष बदलासंदर्भात अशी कोणतीही चर्चा नाही”, असं अमित देशमुख यांनी स्पष्ट केलं. ते टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलत होते.

विरोधकांना ईव्हीएमबाबत संशय का?

“सध्या ईव्हीएमबाबत अनेकांना संशय आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने हा संशय दूर केला पाहिजे. हा संशय माझा नाही तर मतदारांचाही आहे. त्यामुळे कोणी लोकशाही प्रणालीवर शंका उपस्थित करत असेल तर ती शंका दूर करणं हे निवडणूक आयोगाचं काम आहे. तुम्ही काही ठिकाणी ईव्हीएमवर निवडणूक घेतली तर काही ठिकाणी बॅलेटवर घ्या, म्हणजे शंका होतील”, असंही अमित देशमुख यांनी म्हटलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amit deshmukh on congress state president nana patole maharashtra assembly election 2024 politics gkt