Amit Deshmukh : विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला आलेल्या अपयशानंतर आता महाविकास आघाडीत फूट पडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. याचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपासून आघाडीतील तिनही पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. यातच आज (११ जानेवारी) शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे महाविकास आघाडीतील फुटीसंदर्भातील चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे.
दरम्यान, महापालिका निवडणुका स्वबळावर लढवण्याच्या ठाकरे गटाच्या घोषणेनंतर काँग्रेसची प्रतिक्रिया समोर आली आहे. ठाकरे गटाच्या घोषणेनंतर आता काँग्रेसची भूमिका काय? यावर काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांनी मोठं भाष्य केलं आहे. ‘काँग्रेस देखील आपआपल्या परीने निवडणुकीची तयारी करत आहे’, अशी सूचक प्रतिक्रिया अमित देशमुख यांनी दिली. ते टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलत होते.
हेही वाचा : महाविकास आघाडीत फूट? “काय होईल ते होईल, आम्ही सर्व महापालिका स्वबळावर लढवणार”, ठाकरे गटाची मोठी घोषणा
अमित देशमुख काय म्हणाले?
“प्रत्येक निवडणूक आणि निवडणुकीचे संदर्भ वेगळे असतात, म्हणजे लोकसभेच्या निवडणुका, विधानसभेच्या निवडणुका आणि महापालिकेच्या निवडणुका. त्यामुळे याबाबत महाविकास आघाडीत चर्चा होईल. तसेच आता पुढे कशा पद्धतीने जायचं हे महाविकास आघाडीतील नेते चर्चा करतील आणि निर्णय घेतील”, असं अमित देशमुख यांनी म्हटलं.
ठाकरे गटाने स्वबळाची घोषणा करण्याआधी चर्चा व्हायला हवी होती असं वाटतं का? असं विचारलं असता अमित देशमुख यांनी म्हटलं की, “प्रत्येक गोष्टीची चर्चा होईल असं नाही. प्रत्येक पक्ष आपआपल्या परीने निवडणुकीची तयारी करत असतो. तसं काँग्रेस देखील महापालिकेच्या निवडणुकीची आपल्यापरीनं तयारी करत आहे. तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या याबाबत बैठका सुरु आहेत. त्यामुळे लोकांच्या महापालिकेच्या निवडणुकीबाबत मोठ्या अपेक्षा आहेत, कारण गेले काही वर्ष या निवडणुकाच झालेल्या नाहीत. त्यामुळे आता ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी आम्ही एकत्र बसून चर्चा करू. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात”, असंही अमित देशमुख म्हणाले.
महापालिकेबाबत ठाकरे गटाने काय घोषणा केली?
“मुंबईसह नागपूरपर्यंत आम्ही महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार आहोत. मग काय होईल ते होईल? एकदा आम्हाला आजमावायचंच आहे. आम्ही महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढणार आहोत. नागपूरला सुद्धा आम्ही स्वबळावर लढणार आहोत. आम्हाला उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भातील संकेत दिलेले आहेत. आमचं असा निर्णय होत आहे की मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर असेल. कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? कारण आघाडीत आणि विधानसभेत कार्यकर्त्यांना निवडणूक लढण्याची संधी मिळत नाही. त्याचा फटका पक्षाला आणि पक्षाच्या वाढीला बसतो. महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि नगरपंचायतीमध्ये निवडणुका स्वबळावर लढून आपआपले पक्ष मजबूत करावे लागतात”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.