धाराशिव जिह्यातील आजची राजकीय परिस्थिती, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मांडलेल्या सूचना पाहता धाराशिव लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसला देण्यात यावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसकडे करण्यात आली आहे. लोकसभेसाठी उमेदवार म्हणून प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्याचा ठरावही जिल्हा काँग्रेसने घेतला असल्याचे जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक तथा माजी मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.
जिल्हा काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, माजी जिल्हाध्यक्ष विश्वास शिंदे, जिल्हा प्रभारी विश्वनाथ चाकोते आदींची प्रमुख उपस्थिती होती.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची रविवारी जिल्हा काँग्रेस कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर अमित देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला.
धाराशिव लोकसभा मतदारसंघ शिवसेनाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. शिवसेनेचे ओमप्रकाश राजे सध्या या मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले आहेत. मात्र शिवसेनेकडे असलेल्या या जागेवर आता काँग्रेसने दावा सांगितला आहे. पारंपरिक काँग्रेसची जागा आघाडीच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली. धाराशिव लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस आपला पारंपारिक वारसा सक्षमपणे सिद्ध करेल, त्यासाठी लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी काँग्रेसलाच मिळायला हवी, असा ठराव आजच्या बैठकीत घेण्यात आला. प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष माजी मंत्री बसवराज पाटील यांना उमेदवार म्हणून घोषित करण्यात यावे असा आग्रहही कार्यकर्त्यांनी धरला. अन्य दुसरे कोणतेही नाव त्यासाठी स्पर्धेत नसल्याने बसवराज पाटील यांच्या नावाची शिफारस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे करण्यात आली असल्याची माहिती देशमुख यांनी यावेळी दिली.
राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी पक्ष सक्षमपणे निवडणुकीत प्रभावी ठरू शकेल तेथील जागा काँग्रेसला मिळावी यासाठी मागणी केली जाणार आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. इंडिया या गटबंधानात असलेल्या सर्व मित्रपक्षांशी चर्चा करूनच जागावाटप होईल. त्या-त्या भागात अधिक शक्तिशाली असलेल्या पक्षाचा त्यांच्या ताकदीनुसार सर्वसंमतीने विचार केला जाईल. धाराशिव जिल्ह्यातील पक्षनेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत जागा सोडवून घ्यावी अशी तीव्र इच्छा आहे. बसवराज पाटील यांच्या उमेदवारीबाबतही सर्वांनी उत्स्फूर्तपणे ठराव घेतला असल्याचे अमित देशमुख यांनी सांगितले.
मतदारसंघात लिंगायत, मुस्लीम आणि दलित समाजाची मोठी संख्या आहे. त्याचबरोबर सर्व घटकातील मतदार अनेक वर्षांपासून काँग्रेससोबत जोडला गेला आहे. पक्षाने लोकसभेसाठी उमेदवारी दिल्यास संघटनात्मक पातळीवर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण होईल. मतदारसंघात काँग्रेसच्या विजयाची शक्यता मोठी असल्याची भावना अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यावेळी मोठ्या उत्साहाने मांडली. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मागणीचा गांभीर्याने पक्षश्रेष्ठींनी विचार करायला हवा, असेही देशमुख यांनी यावेळी सांगितले.
काँग्रेसच विजयाची दावेदार
धाराशिव लोकसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाने आजवर तब्बल बारावेळा निवडणूक लढविली आहे. त्यापैकी अकरावेळा काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत यश मिळविले आहे. आघाडीच्या राजकारणात लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली. त्यानंतर पाच निवडणुका राष्ट्रवादीने लढविल्या. मात्र केवळ २००९ साली त्यांना यश मिळाले. लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या विजयाचा दर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करणारा आहे. त्यामुळे माजी मंत्री बसवराज पाटील यांना उमेदवारी मिळायला हवी, असा आग्रह जिल्ह्यातील सर्व पदाधिकार्यांनी या बैठकीत धरला होता.