सांगली : भारत-पाकिस्तान यांच्यात निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीमुळे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचा उद्या गुरूवारी होणारा सांगली व कोल्हापूर दौरा रद्द करण्यात आला आहे. शहा सांगलीत गणेश दर्शन आणि कोल्हापुरात अंबाबाईचे दर्शन घेणार होते. यासाठी पोलिसांनी आज सांगलीत बंदोबस्ताची रंगीत तालीमही घेतली होती.
लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शहा यांचा सांगली दौरा आयोजित करण्यात आला होता. याची तयारीही पक्षीय पातळीवर सुरू होती. शहरात दर्शनी ठिकाणी संवाद मेळाव्याचे डिजिटल फलकही झळकले आहेत. बठकीच्या मार्गावर आज सकाळपासूनच पोलीस बंदोबस्तही तनात करण्यात आला होता. बठकीच्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी भेट देऊन बंदोबस्ताची आखणीही केली होती. मात्र सीमेवर तणाव निर्माण झाल्याने शहा यांचा दौरा अखेरच्या क्षणी रद्द करण्यात आला असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी सायंकाळी दिली.
यापूर्वी जानेवारीच्या अखेरच्या सप्ताहात तासगावमध्ये शहा यांचा दौरा आयोजित करण्यात आला होता. तोही अखेरच्या क्षणी रद्द केल्यानंतर या दौऱ्याचे नियोजन करण्यात आले होते. तथापि, नियोजनाप्रमाणे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाच्या पदाधिकारी यांची भाजपा संघटन संवाद बैठक कर्नाळ रोडवरील धनंजय गार्डन येथे होणार आहे, अशी माहिती पक्षाचे प्रदेश चिटणीस मकरंद देशपांडे यांनी दिली. या बठकीस महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख, खा. संजयकाका पाटील, आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्यासह सर्व पदाधिकारी, सांगली व मिरज विधानसभा मतदार संघातील बूथ कार्यकत्रे उपस्थित राहणार
आहेत. या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दृष्यवाणीच्या (व्हीसी) माध्यमातून संवाद साधणार आहेत. कोअर कमिटीच्या बठकीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आढावा घेण्यात येणार आहे.