Amit Shah On Sharad Pawar and Uddhav Thackeray : भारतीय जनता पक्षाचे नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. अमित शाह यांचा हा दौरा आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यात अमित शाह हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांबरोबर महत्वाची बैठक घेणार असल्याचं बोललं जात आहे. याबरोबरच अमित शाह यांच्या हस्ते आज प्रधानमंत्री आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील २० लाख लाभार्थ्यांना घरकुलांचे मंजुरीपत्र वाटप करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील उपस्थित होते. दरम्यान, या कार्यक्रमात बोलताना अमित शाह यांनी राज्य सरकारच्या कामाचं कौतुक केलं. तसेच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता जोरदार हल्लाबोल केला. “महाराष्ट्रातील जनतेने खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी कोणाची हे निवडणुकीत दाखवलं आहे”, अशी टीका अमित शाह यांनी केली आहे.

गृहमंत्री अमित शाह काय म्हणाले?

“मी महाराष्ट्रातील जनतेचे खूप खूप आभार मानतो. कारण महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला निवडणुकीत आशीर्वाद दिला. भारतीय जनता पार्टी, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचं सरकार जनतेने बनवलं. जनतेने महायुतीला ऐतिहासिक बहुमत दिलं. मात्र, त्याबरोबरच कोणती शिवसेना खरी आणि कोणती शिवसेना खोटी याचाही निर्णय जनतेने केला. तसेच कोणती राष्ट्रवादी खरी आणि कोणती राष्ट्रवादी खोटी याचाही निर्णय महाराष्ट्रातील जनतेने केला”, असं म्हणत गृहमंत्री अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.

फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांच्या कामाचं कौतुक

दररम्यान, गृहमंत्री अमित शाह यांनी पुण्यातील कार्यक्रमात बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाचं कौतुक केलं. अमित शाह म्हणाले की, “अनेकदा असं होतं की अनेक सरकार सत्तेत येतात आणि घोषणा करतात. त्यानंतर कितीतरी वर्ष घोषणा पूर्ण करण्यासाठी लागतात. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारला मी शुभेच्छा देतो. कारण राज्य सरकारने २० लाख कुटुंबाला घरे देण्याचं काम केलं. २० लाख कुटुंबांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम केंद्र सरकार आणि राज्य सरकारने मिळून केलं. आज एक महत्वाचा दिवस आहे. २० लाख कुटुंबाला स्वत:चं आणि हक्काचं घर मिळालं. त्या सर्वांना भारत सरकारच्यावतीने आणि महाराष्ट्र सरकारच्यावतीने शुभेच्छा देतो”, असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.