एरवी भाजपच्या कुठल्याही राष्ट्रीय नेत्याचे आगमन नागपुरात झाले की, प्रथम संघ कार्यालय आणि नंतर नितीन गडकरी यांचे निवासस्थान ही त्यांच्या भेटीची सर्वपरिचित ठिकाणे असतात. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या पहिल्याच नागपूर दौऱ्यात मात्र देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान अग्रस्थानी आले आणि नंतर शहा संघस्थानी गेले. राज्याच्या राजकारणात परतण्यात रस नसलेले गडकरी यांच्या घरी शहा गेले नाहीत मात्र विमानाला वेळ असल्याचे कारण देत खासदार अजय संचेती यांच्याही घरी त्यांनी चर्चा केली.
राज्यात दोन महिन्यांनी विधानसभा निवडणुका असल्यामुळे शहा यांची नागपूर भेट महत्त्वाची मानली जाते. या भेटीचे केंद्रस्थान प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांचे धरमपेठेतील निवासस्थान झाले होते. शहा यांनी प्रसार माध्यमांशी संवाद आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका टाळत न बोलता या भेटीत पुढचे राजकीय संकेत दिल्याचे मानले जाते. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर राज्यात नेतृत्वाचा प्रश्न निर्माण झाला. गडकरी यांनी राज्याच्या राजकारणात परतणार नसल्याचे जाहीर केले. या पाश्र्वभूमीवर विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने शहा यांनी नागपूरला भेट द्यावी, असे निमंत्रण फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली कोअर कमिटीच्या सदस्यांनी दिल्लीत दिले होते.
फडणवीस यांच्या निवासस्थानी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची सकाळपासून लगबग होती. यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी तर फडणवीस यांच्याकडे राज्याचे नेतृत्व द्यावे, अशी मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र, फडणवीस यांनी त्याबाबत खंडन केले. असे असले तरी शहा यांनी फडणवीस यांच्या निवासस्थानी नेत्यांच्या भेटी घेणे, हे फडणवीस यांच्या दृष्टीने सकारात्मक मानले जात आहे.

Story img Loader