महाराष्ट्र सरकारने अलीकडेच आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दिला. हा पुरस्कार सोहळा रखरखत्या उन्हात आयोजित केला होता. या कार्यक्रमाला लाखो लोक उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी लोकांना भरउन्हात तब्बल तीन तास बसावं लागलं. यामध्ये १३ लोकांचा उष्माघाताने मृत्यू झाला. याच पार्श्वभूमीवर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. संबंधित तिघांनी १३ लोकांची हत्या केली, असं त्यांनी म्हटलं आहे.
‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराच्या कार्यक्रमात घडलेल्या उष्माघात प्रकरणावर भाष्य करताना इम्तियाज जलील म्हणाले की, “आप्पासाहेब धर्माधिकारी यांचं काम खूप मोठं आहे. त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार मिळाला, यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो. पण हा पुरस्कार देण्यासाठी जो कार्यक्रम घेण्यात आला, या कार्यक्रमाला धर्माधिकारी यांचे २० लाख अनुयायी बोलवण्यात आले होते. त्यांच्या मतांसाठी हा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमासाठी १४ कोटी रुपये खर्च केले, असं मला सांगण्यात आलं.”
हेही वाचा- राजकीय भूकंपाबाबतची मोठी अपडेट; नाराजीच्या चर्चांवर अजित पवारांनी मांडली थेट भूमिका, म्हणाले…
“या कार्यक्रमात स्वत:ला घाम येऊ नये, म्हणून तुम्ही (अमित शाह, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस) शेडमध्ये बसले होते. पण लाखोंच्या संख्येनं कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्या गोर-गरीब अनुयायांना तुम्ही उन्हात बसवलं. यामध्ये १३ लोकांचा बळी गेला, हा बळी गेला नाही तर हत्या झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी या हत्या केल्या,” असं गंभीर विधान जलील यांनी केलं. ते ‘साम टीव्ही’शी बोलत होते.
हेही वाचा- “एकच वादा…”; अजित पवारांची नाराजी ही राष्ट्रवादीची नियोजित खेळी होती? NCP च्या आमदाराचं मोठं विधान!
“त्यांनी आपली जबाबदारी खूप चांगल्या पद्धतीने पार पाडली. तुम्ही गरीब लोक आहात, तुम्ही मेलात तर काय फरक पडणार नाही. आम्ही तुम्हाला सरकारी तिजोरीतून पाच लाख रुपये देतो. पण तुम्हाला लाज वाटायला हवी. माणसाची किंमत तुम्ही पाच लाख रुपये इतकी केली. तुम्हाला थोडीतरी लज्जा असेल तर पीडित कुटुंबियांना प्रत्येकी ५० लाख रुपये मदत करा. आपल्या राजकीय स्वार्थासाठी तुम्ही लोकांचा बळी घेतला. यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी तर राजीनामा द्यायला हवा होता. हीच घटना परदेशात घडली असती तर व्यासपीठावर बसलेला तिन्ही जणांना राजीनामा द्यावा लागला असता. पण तुम्ही राजीनामा देणार नाहीत,” अशी टीका जलील यांनी केली.