Amit Shah : शिर्डीतल्या मेळाव्यात अमित शाह यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शिर्डीतल्या अधिवेशनात भाजपाच्या कार्यकर्त्यांचं अमित शाह कौतुक केलं आहे. विरोधकांवर अमित शाह यांनी जोरदार टीका केली. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच हा मोठा कार्यक्रम पार पडला. राज्यभरातील भाजपाचे बडे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते या सोहळ्याला उपस्थित होते. अमित शाह यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गद्दारी, फसवणूक करणाऱ्या उद्धव ठाकरेंना घरी बसवलं-शाह

महाराष्ट्राच्या विजयाचे अनेक अर्थ आहेत. महाराष्ट्राच्या विजयाने १९७८ पासून शरद पवारांनी जे दगा फटक्याचं जे राजकारण होतं ते २० फूट गाडण्याचं काम केलं. उद्धव ठाकरेंनी आपल्याशी जो द्रोह केला, २०१९ ला विचारधारा सोडली आणि बाळासाहेब ठाकरेंच्या सिद्धातांशी तडजोड केली. फसवणूक करुन, लबाडी करुन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते. उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राने त्यांची जागा दाखवली. १९७८ ते २०२४ पर्यंत महाराष्ट्रात अस्थिरतेचं राजकारण सुरु होतं. ते जनतेने संपवून दाखवलं.

महाराष्ट्रात आपलाच विजय होईल असं विरोधकांना वाटत होतं-शाह

हिंदुत्व आणि मोदींच्या विकासाच्या राजकारणाला लोकांनी मतं दिली. विरोधी पक्ष बाह्या सरसावून वाट बघत होते की लोकसभेनंतर महाराष्ट्रात आपलाच विजय होईल. त्यांचं स्वप्न भंग करण्याचं काम महाराष्ट्राच्या जनतेने केलं. अनेक निवडणुका अशा असतात ज्या राज्यांचं राजकारण बदलतात. काही निवडणुका अशा असतात ज्या देशाचं राजकारण बदलतात. मी आज तुम्हाला जे सांगतो आहे ते लक्षात ठेवा आणखी २५ वर्षांनी इतिहास साक्षीदार असेल की महाराष्ट्राचा महाविजयाचं उदाहरण दिलं जाईल. या महाविजयाचे शिल्पकार म्हणजे भाजपाचे कार्यकर्ते आणि महाराष्ट्राची जनता आहे असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे. मी महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतो कारण सिद्धातांचं राजकारणच चालणार हे जनतेने दाखवून दिलं आहे. माझ्या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचे आणि शेतकरी बांधवांचेही मी आभार मानतो.

हे पण वाचा- Ashish Shelar : “शरद पवारांच्या पक्षाची अवस्था गाढवाच्या…”, भाजपा आमदाराची घणाघाती टीका

शरद पवारांना अमित शाह यांचं जोरदार उत्तर

मी एक चित्र पाहिलं होतं त्यात शरद पवार महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये म्हणजेच उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी काय काय होईल ते पत्रकारांना सांगत होते. आज मी शरद पवारांना सांगू इच्छितो, उत्तर महाराष्ट्रात २२ पैकी २१ जागा आमच्या महायुतीने जिंकल्या, कोकणात १७ पैकी १६, पश्चिम महाराष्ट्रात २६ पैकी २४, पश्चिम विदर्भात १७ पैकी १५, पूर्व विदर्भात २९ पैकी २२, मराठवाड्यात २० पैकी १९ आणि मुंबईत १७ पैकी १५ जागा आम्ही जिंकल्या आहेत. महायुतीत काहींची तिकिटं कापली गेली, काही लोकांच्या महत्त्वकांक्षा पूर्ण झाल्या नाहीत. मात्र आमच्या दोन्ही मित्रपक्षांना कमळ हेच सर्वस्व मानून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही निवडून दिलं. महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलं आहे एकनाथ शिंदेंची शिवसेनाच बाळासाहेबांची शिवसेना आहे आणि अजित पवारांची राष्ट्रवादीच खरी राष्ट्रवादी आहे. ज्यांनी लबाडी आणि विश्वासघात यांचं राजकारण सुरु केलं त्या शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना घरी बसवण्याचं काम महाराष्ट्राने केलं आहे असंही अमित शाह यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amit shah firey attack on uddhav thackeray maharashtra people made traitors like him sit at home scj