Amit Shah: निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हेलिकॉप्टर आणि बॅगांची तपासणी केली आहे. अमित शाह शुक्रवारी हिंगोली येथे दौऱ्यासाठी आले असताना त्यांच्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आली. विरोधकांच्या बॅगा तपासल्यानंतर सत्ताधाऱ्यांच्याही बॅगा तपासणार का? असा एक आरोप केला जात होता. त्यानंतर आता अमित शाह यांची बॅग तपासण्यात आली आहे. याचा व्हिडीओ अमित शाह यांनी एक्सवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करताना अमित शाह यांनी म्हटले की, पारदर्शक पद्धतीने निवडणूक व्हावी, यासाठी भाजपा निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करण्यावर विश्वास ठेवतो.

अमित शाह यांनी एक्स पोस्टवर लिहिले, “हिंगोली विधानसभा मतदारसंघात प्रचार करत असताना निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून माझ्या हेलिकॉप्टरची तपासणी करण्यात आली. निष्पक्ष निवडणुका आणि निरोगी निवडणूक प्रणालीवर भाजपा विश्वास ठेवतो. तसेच निवडणूक आयोगाने बनविलेल्या सर्व नियमांचे पालन आम्ही करतो.”

मागच्या काही दिवसांपासून अनेक नेत्यांच्या बॅगांची तपासणी केली जात आहे. त्यावरून सोशल मिडियासह इतर माध्यमातदेखील चर्चा होत आहे. निवडणूक आयोगानेही यावर स्पष्टीकरण दिलेले आहे. पंतप्रधान नरेंद्र यांच्याच हेलिकॉप्टरची फक्त तपासणी केली जात नाही. ते वगळता इतर सर्व नेत्यांच्या बॅग, हेलिकॉप्टरची तपासणी निवडणूक आयोगाकडून केली जाते, असे आयोगाने सांगितले होते. उद्धव ठाकरे यांची यवतमाळ जिल्ह्यातील वणी आणि लातूर जिल्ह्यातील औसा येथे तपासणी केली होती.

आपण सर्वांनी निरोगी निवडणूक व्यवस्थेसाठी योगदान दिले पाहीजे आणि जगातील सर्वात मजबूत लोकशाही बनविण्यासाठी आपले कर्तव्य बजावले पाहीजे, असेही अमित शाह म्हणाले.

Story img Loader