छत्रपती संभाजीनगर (आधीचं नाव औरंगाबाद) हा गेल्या तीन दशकांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. या लोकसभा मतदारसंघात सात वेळा शिवसेनेचा खासदार निवडून आला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा या मतदारसंघात अवघ्या ५ हजार मतांनी पराभव झाला होता. एमआयएमच्या इम्तियाज जलील यांनी खैरेंना या मतदारसंघात धूळ चारली होती. आता आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीकडून छत्रपती संभाजीनगरमध्ये मोर्चेबांधणी चालू आहे. महाविकास आघाडीत ही जागा शिवसेनेच्या ठाकरे गटाला मिळू शकते आणि चंद्रकांत खैरे पुन्हा एकदा या मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. दुसऱ्या बाजूला महायुतीत शिवसेनेच्या शिंदे गटाने छत्रपती सभाजीनगरच्या जागेवर दावा केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चंद्रकांत खैरे ठाकरे गटात असल्याने शिवसेनेच्या शिंदे गटाकडे या मतदारसंघात तगडा उमेदवार नसल्याचं बोललं जात आहे. तरी शिंदे गट या मतदारसंघात वेगवेगळ्या नेत्यांबाबत चाचपणी करत आहे. त्याचबरोबर शिंदे गट या मतदारसंघातून मराठा आंदोलक (मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आणि मराठा आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका करणारे) विनोद पाटील यांना उमेदवारी देणार असल्याचं बोललं जात आहे. पाटील यांनी याबाबत नुकतीच माहिती दिली आहे. युतीत ही जागा आपलीच आहे असं शिंदे गटाच्या नेत्यांनी याआधी ठणकावून सांगितलं आहे. अशातच आज (५) मार्च केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची छत्रपती संभाजीनगर येथे सभा पार पडली. या सभेत बोलताना अमित शाह यांनी ही जागा भाजपाला मिळणार असल्याचे संकेत दिले.

छत्रपती संभाजीनगरमधून भाजपाचा उमेदवार निवडणूक लढवेल असे संकेत अमित शाह यांनी दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी संभाजीनगरातून एक कमळ दिल्लीला गेलं पाहिजे, असं आवाहन शाह यांनी संभाजीनगरच्या जनतेला केलं आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड हे संभाजीनगरमधून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नशील आहेत. भाजपा या मतदारसंघात कराड यांच्याबद्दल विचार करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळाच चालू आहे. त्यामुळे भाजपा कराडांना संभाजीनगरमधून लोकसभेच्या रिंगणात उतरवू शकते.

दरम्यान, छत्रपती संभाजीनगरमधील जाहीर सभेला संबोधित करताना अमित शाह म्हणाले, मी इथे येण्यापूर्वी संभाजीनगर मागितलं आहे. संपूर्ण देशात या संभाजीनगरचं नाव घेतलं जातं. परंतु, कोणी विचारलं, संभाजीनगरचा खासदार कुठल्या पक्षाचा आहे तर उत्तर येतं, मजलिसचा (असदुद्दीन ओवैसी यांचा ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन पक्ष) खासदार आहे. मी आज इथे जमलेल्या लोकांना विचारू इच्छितो की, तुम्ही इथून निघताना एक निर्धार करून जाल का? छत्रपती संभाजीनगरातून मजलिसला उखाडून फेकण्याचा निर्धार करणार का? मजलिसला हटवून पंतप्रधान मोदी यांना संभाजीनगरमधून एक कमळ पाठवणार का? मोदी यांना ४०० पार नेणार का? मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवणार का?

हे ही वाचा >> आदित्य ठाकरेंनी दिल्लीत घेतली अमित शाहांची भेट? केसरकरांचा मोठा दावा; म्हणाले, “राजकीय पथ्य पाळलं असतं…”

“नव्या निजामांना घरी बसवण्याची वेळ आली आहे”

अमित शाह जनसभेला संबोधित करताना म्हणाले, आपल्याला काही लोकांना आता घरी बसवावं लागेल, तशी वेळ आली आहे. सरदार पटेल यांनी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मराठवाड्याला निजामापासून मुक्त केलं होतं. आता या नव्या निजामांना घरी बसवायची आणि त्यांना त्यांची जागा दाखवायची वेळ आली आहे. यावेळी आम्हाला महाराष्ट्रातून ४० ते ४१ जागा नकोत तर ४५ पेक्षा जास्त मोदींसाठी द्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amit shah hint bjp can contest chhatrapati sambhaji nagar lok sabha election aurangabad asc